हास्य क्लब खोपोलीतर्फे योग विज्ञान शिबिरांचे आयोजन Print

खोपोली, २४ ऑक्टोबर
बाबूभाई ओसवालप्रणीत हास्य क्लब, खोपोली-खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व पतंजली योगपीठ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने २६ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ५.३० ते ७.३०, सायंकाळी ६ ते ८ दरम्यान खास मधुमेह रुग्ण व अतिरिक्त वजन असलेल्या महिला व पुरुष नागरिकांसाठी जनता विद्यालयाच्या पंत पाटणकर क्रीडांगणावर विनामूल्य योग विज्ञान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचे उद्घाटन २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये पतंजली योगपीठ रायगडचे माजी अध्यक्ष तथा योगतज्ज्ञ गौतमभाई लेवूवा, पुणेस्थित आरोग्यम् योगाश्रमाचे संचालक तथा योगतज्ज्ञ अनंत झांबरे, सुनीती झांबरे, खोपोलीच्या रेकी व योगतज्ज्ञ जयमाला पाटील शिबिरार्थीना योग, प्राणायाम व आहार नियंत्रण याबद्दल प्रात्यक्षिकासह उद्बोधक मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरातील शिकवण सातत्यपूर्ण आचरणात आणल्यास मधुमेह व अतिरिक्त वजन नियंत्रणात येते. उर्वरित आयुष्य चिंतामुक्त व आनंदमय होते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी व अतिरिक्त वजन असलेल्या नागरिकांनी या विनामूल्य योग विज्ञान शिबिरांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संध्या पाटील (९०९६७९२६२८), जयमाला पाटील (८६९८६२४३७५), हेमंत नांदे (९२२६९६०६९३) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन हास्य क्लबचे अध्यक्ष बाबूभाई ओसवाल यांनी केले आहे.