सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा परिसरात सोने लुटण्याचा उत्सव साजरा Print

वार्ताहर , सावंतवाडी
विजयादशमीच्या दिनी सोने लुटण्याचा उत्साह जनतेत होता. अनेकांनी पारंपरिक पद्धतीने सोने लुटले तर अनेकांनी ज्वेलरीच्या दुकानात जाऊन सोने खरेदी केले. विजयादशमीच्या दिनी सोनं लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम विविध ठिकाणी झाला. सावंतवाडी संस्थानने राजवाडा परिसरात सोनं लुटण्याचा पारंपरिक उत्सव ठेवला होता. त्याला अनेक संस्थानच्या नागरिकांनी सहभाग दर्शविला.
सावंतवाडी राजवाडा येथे सुमारे ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ हा उत्सव सुरू आहे. या वेळी पूजा करून बळी दिल्यावर आपटय़ाची पानं सोनं म्हणून लुटण्याचा कार्यक्रम असतो. संस्थानिक बापूसाहेब महाराज यांच्या काळापासून कुवाळा बळी देण्याची प्रथा आहे. संस्थानचे राजगुरू कोळंबेकर यांनी आपटय़ाच्या झाडाचे विधिवत पूजन केले.
सावंतवाडी राजवाडा आवारात सोनं लुटण्यासाठी समाजातील विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती. सोनं लुटण्याचा विजयादशमीचा पारंपरिक उत्सव अनेक ठिकाणी साजरा झाला.