रेडी किनाऱ्याजवळ मायनिंग साठय़ांना खासगी सुरक्षा! Print

वार्ताहर , सावंतवाडी
रेडी सागरकिनारी एका सरकारी जमिनीत असणाऱ्या मायनिंग साठय़ाचे संरक्षण करण्यासाठी एका खासगी कंपनीने सुरक्षारक्षक नेमला आहे, असे बोलले जाते. महसूल खात्याच्या काहींनी त्याची पाठराखण केली असल्याचे सांगण्यात येते.
रेडी भागात १९ डम्प आहेत. मायनिंग काढून टाकाऊ माती खासगी मालकांच्या जमिनीत साठा करून ठेवली आहे. हे मायनिंग साठे सध्या किमती बनले आहेत. त्या मायनिंग साठय़ांकडे गोवा व सिंधुदुर्गातील मायनिंगवाल्यांचे लक्ष आहे. या मायनिंग साठय़ांना मागणी आहे. खनिकर्म विभागाकडे तशा प्रकारची मागणीही करण्यात आली आहे. मायनिंग साठे खासगी मालकीच्या जमिनीत असल्याने त्याची मालकी खासगी जमीन मालकांकडे जाते. या मायनिंग साठय़ांसाठी सरकारचे धोरण ठरले नाही, पण सध्या हे मायनिंग साठे उचलून नेण्याचे धोरण ठरत आहे, असे बोलले जाते. खनिकर्म विभागाने १९ साठय़ांबाबत सर्वेक्षणही केले आहे, पण महसूल व खनिकर्म विभागाने या साठय़ांच्या संरक्षणासाठी कोणतीही खबरदारी घेतली नाही, असे बोलले जात आहे. गोवा राज्यात सध्या मायनिंग बंद असल्याने अनेकांच्या नजरा रेडी मायनिंग साठय़ावर खिळल्या आहेत. रेडी पोर्ट जवळच असल्याने काही साठे उचलून नेण्याचे धोरण आखले जात असल्याचे बोलले जात आहे. या भागात एका सरकारी जमिनीत मायनिंग साठा आहे. हा साठा सरकारी जमिनीत असल्याने साहजिकच त्याची मालकी सरकारी मानली जात आहे. या सरकारी साठय़ाचे संरक्षण खासगी कंपनी करत आहे. या भागातील तलाठय़ाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा संपर्क होऊ शकला नाही