सिंधुदुर्ग, गोवा, बेळगावात आर्थिक गुंतवणूक वाढली Print

वार्ताहर,सावंतवाडी
सिंधुदुर्ग, बेळगाव आणि गोवा ही स्थळे काळा पैसा लपविण्याची महत्त्वाची ठिकाणे बनली आहे. यामुळे या तिन्ही ठिकाणच्या आर्थिक गुंतवणुकीत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येते. स्विस बँकेत मोठमोठय़ा धनिक, राजकीय मंडळींनी काळ्या पैशांची गुंतवणूक केली असल्याचा मुद्दा भारतात चर्चेत येत असतो. या  चर्चेवेळी सिंधुदुर्ग, बेळगाव व गोवा येथे झालेल्या काळा पैशाच्या गुंतवणुकीचा उल्लेख होत असतो.  कर्नाटक-बेळगाव आणि गोवा राज्याच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिल्हा असल्याने तीनही भागातील धनिक व राजकीय नेते आपला काळा पैसा सोईनुसार येथे गुंतवत असतात.
सिंधुदुर्गातील अनेकांनी गोवा व बेळगावमध्ये काळी माया गुंतविली आहे, तर गोवा, बेळगावमधील अनेकांनी सिंधुदुर्गची निवड केली आहे. हा काळा पैसा गुंतवणूक करताना सिंधुदुर्ग, बेळगाव व गोवा येथे सर्व संबंधितांनी दक्षता घेतली आहे. अवैध धंद्यातून मिळणारा पैसा  व्यवहारात आणण्यासाठी वेगवेगळ्या गुंतवणुकींचा मार्ग अवलंबला जातो. सोने व जमिनीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे, पण बँकांत गुंतवणूक करणाऱ्यांनीही सीमावर्ती भागात गुंतवणुकीचा नवा मार्ग चोखाळला आहे. सिंधुदुर्ग, गोवा व बेळगाव भागांत अनेकांचे जाणेयेणे असते. या बाजारपेठा अनेकांना फायदेशीर ठरतात. त्यामुळे साहजिकच काळा पैसा राज्यात ठेवण्यापेक्षा अन्य राज्यांत ठेवण्यासाठी सर्वानाच फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, ठेकेदार, राजकीय सौदेबाजी करणारे जवळच्याच या भागात आपली गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. या भागात गुंतवणूक करताना अनेकांनी नातेवाईकांची नावे वापरली आहेत. बँकेत पासबुक काढून गुंतवणूक करणाऱ्यांनी बेनामी नावाचा वापर केला आहे, असे बोलले जात आहे.
या बेनामी बँक खात्यात पैसे गोळा करणारे पठाणी व्याजाने पैसे देत असल्याचे बोलले जात आहे. बँकांपेक्षा पठाणी व्याजाचा धंदा तेजीत असतो. त्यामुळे ती माया शेजारील राज्यांच्या जिल्ह्य़ात भरण्यात येत आहे, असे बोलले जाते. सिंधुदुर्ग, बेळगाव व गोवा या ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सिंधुदुर्गातील सर्व संबंधितांनी बेळगाव आणि गोवा राज्य, तर गोवा व बेळगावने गुंतवणुकीसाठी सिंधुदुर्गची निवड केली आहे. त्यासाठी विविध प्रांतांतील गुंतवणूकदार या भागात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात जमिनीत पैसे गुंतवणूक करणाऱ्यांत चढाओढ लागल्याचे दिसते. त्यामुळे जमिनीचे भावही वधारले आहे. या भागात शेतजमिनीची किंमत वाढली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील जमिनीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, बिहार, गुजरात, आंध्र, दिल्ली अशा विविध राज्यांतील धनिकांनी जमिनीत पैसे गुंतविले आहेत. पर्यटन व फलोद्यान सिंधुदुर्गला अथांग सागरकिनारा व पश्चिम घाट अनेकांना भुरळ पाडतो, म्हणून या भागात गुंतवणुकीत वाढ झाली आहे.