रत्नागिरी जिल्ह्य़ात काँग्रेस मजबूत - रमेश कीर Print

रत्नागिरी
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने प्रत्येक तालुक्यात चांगली कामगिरी केल्याने जिल्ह्य़ात पूर्वीपेक्षा काँग्रेस पक्ष मजबूत झाला आहे. विशेषत: मंडणगड, संगमेश्वर, लांजा, राजापूर व खेड तालुक्यांत पक्षाला चांगले यश मिळाले आहे, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी केले. ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे आजही प्राबल्य असल्याचे ग्रा. पं. निवडणूक निकालावरून स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील काँग्रेस भवनमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ आजच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत झाला. यानंतर तालुकावार सदस्य नोंदणी केली जाणार आहे. तर नुकत्याच झालेल्या ग्रा. पं. निवडणुकीच्या निकालाचाही या वेळी आढावा घेण्यात आला. राजापूर तालुक्यातील ११ ग्रा. पं. काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्या असून आणखी दोन-तीन ठिकाणी आमच्याच पक्षाचा सरपंच बसेल. लांजा तालुक्यात ६ ग्रामपंचायतींमध्ये पक्षाला बहुमत मिळाले आहे. संगमेश्वरातील ४ ग्रामपंचायती पक्षाच्या ताब्यात आल्या असून खेडमध्ये अनसुरे, कोंडिवली या ग्रा. पं.मध्ये पक्षाला बहुमत मिळाले आहे, असे सांगितले.
ग्रा. पं. निवडणुकीत मिळालेल्या या यशात कार्यकर्त्यांचे कष्ट आणि संबंधित उमेदवारांचा जनसंपर्क यांचा मोलाचा वाटा आहे आणि म्हणून या यशाचे श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्यांना असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण स्वत: व कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत, असे कीर यांनी शेवटी सांगितले.