सामाजिक शास्त्रांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रमाणबद्ध पुस्तक Print

‘इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रीसर्च’ चा प्रकल्प
प्रतिनिधी, पुणे
सामाजिक शास्त्र शाखेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवर आता एकच प्रमाणबद्ध पुस्तक तयार करण्यात येणार असल्याचे ‘इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रीसर्च’ चे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी गुरुवारी सांगितले. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या सत्कार समारंभानंतर डॉ. थोरात बोलत होते. ‘इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रीसर्च’ने सामाजिक शास्त्राच्या संशोधनाला चालना देण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमाची आखणी केली असूनत्यानुसार मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास अशा वीस विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणबद्ध पुस्तक तयार करण्याचा प्रकल्प आखला आहे. तयार पुस्तके ती संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, त्याचप्रमाणे स्थानिक भाषांमध्ये त्यांचे भाषांतर करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक विषयामध्ये जागतिक पातळीवर नावाजलेल्या पुस्तकांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करण्यात येणार आहे. याशिवाय सामाजिक शास्त्रांसाठी ‘संशोधन पदधती’वरील पुस्तकाचीही निर्मिती करण्यात येणार आहे. सामाजिक शास्त्रात संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांना ‘फॅकल्टी फेलोशिप’ देण्यात येणार असून संशोधनासाठी दहा जणांना अमर्त्य सेन पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील प्राध्यापकांना त्यांचे संशोधन जगासमोर ठेवण्यासाठी ऑक्सफर्ड, केंब्रिजच्या धरतीवर स्वतंत्र वेब पोर्टल तयार करण्याचा प्रकल्पही ‘इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रीसर्च’ने आखला आहे.थोरात म्हणाले, सामाजिक शास्त्रांवरील संशोधनांमध्ये प्रमाणबद्ध संशोधन पद्धतींचा, आणि मांडणीचा अभाव दिसून येतो. संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी ‘इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रीसर्च’ सध्या प्राधान्याने काम करत आहे. त्यासाठी विविध प्रकल्प आखण्यात आले आहेत. या प्रकल्पांना मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही मान्यता दिली असून त्यासाठी १५ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान दिले आहे. पुस्तक निर्मिती आणि इतर प्रकल्पांवर लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.’’