निळवंडे-भंडारदऱ्यातून आणखी पाणी द्यावे-जयदत्त क्षीरसागर Print

वार्ताहर, बीड
मराठवाडय़ातील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी निळवंडे व भंडारदरा धरणांतील आणखी पाणी सोडावे, यासाठी भूमिका घेणार असल्याची माहिती पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन मंडळाच्या इमारतीचे उद्घाटन मंत्री क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. राज्यमंत्री प्रकाश सोळंके, आमदार विनायक मेटे, अमरसिंह पंडित, जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर आदी उपस्थित होते. क्षीरसागर म्हणाले की मराठवाडय़ातील सर्वच जिल्हय़ांत दुष्काळी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्राचे मराठवाडा व विदर्भ हे लहान भाऊ आहेत. असे असताना दुष्काळी स्थितीत पाणी देण्यास विरोध केला जातो, हे दुर्दैव आहे. नाशिक, नगर जिल्हय़ांतील धरणातून जायकवाडीत पाणी सोडावे. हे पाणी केवळ पिण्यासाठी आहे, अशी मागणी आपण केली, मात्र कालवा समितीने विनाकारण कालवाकालव करत वेळ घालवला.  भंडारदऱ्यातून अडीच टीएमसी पाणी सोडले असले तरी जायकवाडीत दीड टीएमसीच पाणी पोहोचणार आहे. हेच पाणी वेळेत अगोदर सोडले असते तर कालव्याचे पात्र ओले असल्याने मुरले नसते. बाष्पीभवनही झाले नसते व सोडलेले पाणी फारशी तूट न होता मिळाले असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दिवाळीत पाऊस पडला तर बरे. मात्र, पावसाने हुलकावणी दिली तर मराठवाडय़ातील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी निळवंडे व भंडारदरा धरणांतून आणखी पाणी सोडावे लागेल. यासाठी आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत आग्रही भूमिका घेऊ, असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. नैसर्गिक साधनसंपत्तीवर विशिष्ट भूभागाचा अधिकार नसतो, याचा विसर पडलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विनाकारण पाणी सोडण्यास विरोध केला, असा आरोप त्यांनी केला.  परळी-नगर रेल्वेमार्गाबरोबरच नवी मुंबई-बीड-नांदेड-नागपूर हा अतिजलद रेल्वेमार्ग व्हावा, यासाठी सरकारला विनंती केली आहे. हा ड्रीम प्रोजेक्ट उभारण्यास राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.