सव्वापाच किलो सोने लुटणाऱ्या दोघा भावांना कौडगावात अटक Print

औरंगाबाद/ प्रतिनिधी
पैठण येथील नागेबाबा पतसंस्थेतून ५ किलो २०० ग्रॅम सोने लुटून नेणाऱ्या दोघा सख्ख्या भावांना पोलिसांनी शुक्रवारी पैठण ते बिडकीन दरम्यान कौडगावजवळ अटक केली.े मच्छिंद्र विठ्ठल लोखंडे व गोरख विठ्ठल लोखंडे अशी आरोपींची नावे आहेत. गेल्या ३० सप्टेंबरच्या रात्री त्यांनी पैठण येथे छत फोडून हे सोने पळविले होते. दहशतवाद विरोधी पथकाला माहिती देणाऱ्या खबऱ्याने सोने लुटणारे चोर पैठणचे असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार १५ दिवस पाळत ठेवून पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून दीड किलो सोने व साडेपाच लाख रुपये रोख असा ऐवज जप्त करण्यात आला. पैठण येथील नागेबाबा पतसंस्थेत मच्छिंद्र व गोरख लोखंडे या दोघांचेही खाते होते. पैठण शहरात ते बांधकामावर सळ्या टाकण्याचे काम करीत होते. पतसंस्थेत एकदा व्यवस्थापकाने त्यांच्यासमोर तिजोरी उघडली. त्यातील पैसा पाहून चोरी करण्याचे त्यांनी ठरविले.  छत फोडून सहज आत घुसून चोरी करता येईल का, यासाठी टेहळणी केली. ३० सप्टेंबरच्या रात्री स्लॅब फोडून ते पतसंस्थेत उतरले. पहाटे चापर्यंत तिजोरी तोडून त्यांनी साडेपाच किलो सोने लंपास केले. चोरी करण्यापूर्वी तिजोरीत पैसा असेल असा त्यांचा अंदाज होता. पण त्यांना सोने मिळाले व त्यांनी ते पळविले. औरंगाबाद शहरातील एका सोनाराकडे चोरीतील दागिन्यांची विक्री करण्यास शुक्रवारी सकाळी ते निघाले. त्याची खबर मिळताच दुपारी बाराच्या सुमारास पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता पैठण येथे नागेबाबा पतसंस्थेतून सोने पळविल्याचे त्यांनी कबूल केले. बांधकामाशी संबंधित व्यवसाय असणाऱ्या या दोघांकडे छन्नी, हातोडा व इतर साहित्य होतेच. पहाटे चापर्यंत ही चोरी केल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी सांगितले. चोरीनंतर दोन्ही आरोपी औरंगाबादेत भूखंड खरेदीचा प्रयत्न करीत होते.