सावंतवाडी, मडुरा ‘टर्मिनस यार्ड’वर काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभेद! Print

वार्ताहर, सावंतवाडी
कोकण रेल्वेच्या महाराष्ट्रातील शेवटच्या सावंतवाडी आणि मडुरा रेल्वे स्टेशनवर टर्मिनस, यार्ड व्हावे म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीतील गेले काही वर्षांतील मतभेद चव्हाटय़ावर आले आहे. या संघर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांना काँग्रेस व पालकमंत्री नारायण राणे, खासदार नीलेश राणे यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असला तरी आमदार केसरकर यांनी नगर परिषद निवडणुकीतील पराभवाचा काँग्रेस सूड उगवत आहे, असा आरोप केला आहे.
कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या स्थानकावर म्हणजेच सावंतवाडी रोड स्टेशनवर टर्मिनस व्हावे, असा आग्रह राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांचा आहे, तर काँग्रेस नेते पालकमंत्री नारायण राणे, खासदार नीलेश राणे यांनी मडुरा रेल्वे स्थानकाला पसंती दिली आहे. मडुरा हे स्थानक शेवटचे असेल तर विकसनशील दर्जाचे स्थानक म्हणून काँग्रेस नेते, पालकमंत्री नारायण राणे यांच्या कलाने राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर वागत नसल्याने ते विजयी झाल्यानंतरपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मतभेद आहेत. आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात काँग्रेसने कायमच आकांडतांडव केले, पण राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या पाठिंब्यावर आमदार केसरकर यांनी पालकमंत्री नारायण राणे व त्यांच्या टीमवर कायमच टीका केली.
सावंतवाडी नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक विजयी झाले. शिवाय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही पालकमंत्र्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची अर्धी ताकद असल्याचे दाखवून दिले, पण सध्या आमदार केसरकर यांच्या खच्चीकरणासाठी काँग्रेसने जिल्हा परिषद सदस्यांनाच आमदार केसरकर यांच्या विरोधात उभे राहण्यास ताकद दिली. राणे समर्थकांनाच जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देऊन आमदार केसरकर यांनी स्वत:च्या पायावर दगड मारून घेतल्याची प्रचीती त्यांना आली असावी, असे बोलले जात आहे.
कोकण रेल्वेने सिंधुदुर्गला कायमच दुय्यम दर्जाची वागणूक दिली असल्याने टर्मिनस होईल किंवा नाही हा प्रश्न सध्या पडला असतानाच काँग्रेस- राष्ट्रवादीत मडुरा की सावंतवाडी यावरून मात्र राजकारण रंगात आले आहे. आमदार केसरकर यांनी तर लोकसभा निवडणुकीत एक लाख ७० हजार मतदारांना मडुरा येथे टर्मिनस करून काँग्रेस नाकारणार का? असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा काँग्रेसने आमदार दीपक केसरकर यांनी स्वत:च्या विजयाची प्रथम काळजी करावी, असा टोला हाणला आहे. सावंतवाडी व मडुरा रेल्वे स्टेशनच्या मध्ये सुमारे दहा किलोमीटरचा फरक आहे. सध्या सावंतवाडी रोड स्थानकाला दर्जा देण्यात आल्याने रेल्वेचा थांबा आहे तर मडुरा येथे काही गाडय़ा थांबतात. मडुरा रेल्वे स्टेशनवरून रेडी व आरोंदा बंदर, रेडी टाटा मेटलिक व सातार्डा उत्तम स्टील प्रकल्प जवळचे ठरणार असल्याने यार्ड मडुऱ्यात तर टर्मिनस सावंतवाडीत व्हावे अशी मागणी आहे. सावंतवाडी की मडुरा रेल्वे टर्मिनस? या मुद्दय़ावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगला आहे.