‘मिडिया’च्या पाठलागाने गडकरी वैतागले.. Print

खास प्रतिनिधी, नागपूर

पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेडवरील आरोपांच्या घेऱ्यात अडकलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी ‘मिडिया’च्या रोजच्या पाठलागापायी वैतागले आहेत. गडकरींच्या महालमधील वाडय़ाभोवताल सकाळपासून नजर लावून बसणारे इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी आणि कॅमेरामॅनच्या गर्दीने महालातील रहिवासीही वेगळाच त्रास सहन करत आहेत. गडकरींच्या वाडय़ाजवळ भरणाऱ्या भाजी बाजारातही मिडियाने आक्रमण केल्याने गर्दीचा रोख तिकडे वळत आहे.  गडकरी दसऱ्याच्या दिवशी नागपुरात दिवसभर होते. दुसऱ्या दिवशी त्यांचे संध्याकाळच्या विमानाने दिल्ली जाण्याचे नियोजित शेडय़ूल नंतर रद्द करण्यात आले. तरीही मिडियाच्या ओबी व्हॅन्स गडकरींच्या वाडय़ाभोवताल घुटमळत काही ‘गॉसिप’ मिळते का याचा शोध घेत राहिल्या.गडकरींच्या वाहनांचा ताफा परिसरातून दिसेनासा होईपर्यंत कॅमेरा त्यांचा माग घेत आहेत. गुरुवारी दुपारी इलेक्ट्रॉनिक वाहिनी एका प्रतिनिधीवर गडकरींच्या संतापाची गाज कोसळणारच होती. परंतु, गडकरींनी त्याला किरकोळ झापण्यावरच निभावले. मलाही माझी काही वैयक्तिक कामे असतात. माझ्याबद्दल होणाऱ्या आरोपींची चौकशी करण्याची खुली तयारी मी दर्शविलेली आहे. प्रत्येक क्षणाला माझ्यामागे येण्याचे काही कारण नाही, अशी शब्दात गडकरींनी त्याला सुनावल्याचे समजले.
गडकरींचा शुक्रवारी वर्धा दौराही अतिव्यस्त कार्यक्रमांचा होता. पूर्ती जलसिंचन संस्थेतर्फे  पाणी परिषदेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. शेतकऱ्यांसाठी सेलू व अन्य परिसरातून ५० बसेसची व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र, हा कार्यक्रम रद्द केल्याने कार्यकर्ते हिरमुसले. पूर्ती पॉवर अँण्ड शुगर लिमिटेडला अन्य कंपन्यांनी केलेल्या वित्त पुरवठय़ाची चौकशी आयकर खात्याने सुरू केल्याने गडकरींना नव्या अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. गडकरींच्या पूर्ती समूहात गुंतवणूक करणाऱ्या १८ कंपन्यांची चौकशी केली जात असून वित्त पुरवठय़ाचे स्रोत आम्ही शोधून काढले आहेत, अशी माहिती आयकर खात्याच्या सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
आयकर चौकशीचे वृत्त नागपुरात येऊन धडकल्यानंतर गडकरींच्या मागावरील कॅमेरे आणखी सतर्क झाले आहेत. गडकरींच्या पूर्ती समूहाला झालेल्या वित्त पुरवठय़ाच्या स्रोतांची चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे सादर केला जाणार आहे. यासंदर्भातील कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू झाले असून मुंबई आणि पुणे विभागाचे अधिकारी कामाला भिडले आहेत. चौकशीसाठी संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना गरज भासल्यास समन्स धाडण्यात येईल, कदाचित गडकरींनाही हजर राहण्यासाठी समन्स धाडले जाण्याची शक्यता आहे. गडकरींच्या पूर्ती कंपन्यांचे पत्ते बोगस असल्याचेही स्पष्ट झाले असून केंद्रीय कार्पोरेट कंपनी मंत्री वीरप्पा मोईली यांनीही गडकरींची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नागपुरातील पूर्ती समूहाशी संबंधितांचे धाबे दणाणले आहे.