वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे खोपोली परिसरात प्रचंड वित्तीय हानी Print

खोपोली,
२७ ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास खोपोली परिसरात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे प्रचंड मोठय़ा प्रमाणात वित्तीय हानी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील काही भागांतच ओढवलेल्या या भीषण आपत्कालीन घटनेमुळे नागरिक हबकून तर शासकीय यंत्रणा चक्रावून गेली आहे.
रविवारी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, शेकापचे ज्येष्ठ नगरसेवक तथा विरोधी पक्षाचे गटनेते तुकाराम साबळे, खोपोली नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा खालापूरचे तहसीलदार दीपक आकडे, शेकापचे नगरसेवक किशोर पानसरे, रा. काँ.चे नगरसेवक सुभाष घासे यांनी पत्रकारांच्या समवेत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेल्या परिसरास भेट दिली. आपदग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तहसीलदार दीपक आकडे यांनी उपस्थित असलेले अधिकारी, तलाठी व अन्य कर्मचाऱ्यांना आपदग्रस्तांच्या झालेल्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे सक्त आदेश दिले. महावितरणचे कनिष्ठ अभियंता झोपे, दिघे यांना परिसरात कोसळलेले विद्युत पोलच्या ठिकाणी युद्धपातळीवर नवीन पोल बसविण्यात यावेत, परिसरातील नागरिकांचा खंडित झालेला विद्युतपुरवठा तत्परतेने सुरळीत करून देण्यात यावा, असे आदेश दिले.
या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे झेनिथ बिर्ला (इंडिया) लि. कंपनीच्या झेनिथ पाइप्स कारखान्याचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे ५०० फूट लांब, १५० फूट रुंद व ५० फूट उंच असलेल्या एकूण सहा विभागांतील शेडचे ७० टक्के पत्रे उडाले. त्यांचे तुकडे-तुकडे त्या त्या विभागांत पसरले होते. पाइप प्रॉडक्शन, फिनिशिंग सेक्शन, पॅकिंग सेक्शन, पेंटिंग सेक्शन, वेअर व लोडिंग हाऊस, गॅल्व्हनायझिंग सेक्शन, इत्यादी शेड्सचा त्यांमध्ये समावेश होता. या सर्व विभागांत अधिकारी, कर्मचारी, कामगार काम करीत होते. तत्परतेने त्यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतल्यामुळे जीवितहानी टळली. कंपनीतील परिस्थिती अत्यंत भीषण व भयावह होती. कंपनीचे किती लाखांचे नुकसान झाले आहे ते पंचनाम्यानंतर स्पष्ट होणार आहे. तूर्त कारखान्यातील उत्पादन ठप्प झाले आहे. विहारी ठाकूरवाडीतील कातकरवाडीमध्ये प्रचंड मोठा वृक्ष कोसळल्यामुळे तीन विद्युत पोल पार कोलमडून गेले. पोलच्या तारा खेचल्या गेल्या. त्यामुळे घरकुल योजनेअंतर्गत घरात वास्तव्य करणाऱ्या अनंता वाघमारे, अनंता पवार, शंकर वाघमारे, संतोष वाघमारे, भीकू पवार, चंद्रकांत पवार इत्यादींच्या घरातील विद्युत मीटर्स खेचले गेले. वेळीच विद्युत प्रवाह खंडित करण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सिद्धार्थनगर परिसरात तीन विद्युत पोल कोसळल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले. साईबाबानगर येथील दत्तमंदिरावरील सर्व पत्रे उडाले. उडालेले, फुटलेले सीमेंटचे पत्रे लगत राहणाऱ्या अमोल शिंदे, प्रकाश उमटे, संतोष देशमुख, रवी सावंत, चिंतामण म्हसे यांचे भाडेकरू अरुण घारे, यांच्या घरांवर कोसळल्यामुळे या पाचही नागरिकांच्या घरांचे पत्रे फुटून त्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. रहाटवडे येथे राहणारे संतोष पाटील, रमेश जाधव, गोरखनाथ पाटील, तसेच प्रकाशनगर येथील विठ्ठल बारकू गायकवाड, सुजाता गरुड, उदय शांताराम सकपाळ यांच्या घरांचे पत्रे फुटले. संतोष पाटील यांचा फ्रिज जळला. दत्तू चव्हाण यांच्या घरावरील २२ पत्रे उडाले व त्यांचे तुकडे-तुकडे झाले. सुदैवाने ते व त्यांची मुले बचावली. प्रचंड रौद्र रूप वादळी वाऱ्याने व पर्जन्यवृष्टीने धारण केले होते, अशी प्रतिक्रिया या परिसरातील भयग्रस्त महिला व्यक्त करताना आढळून आल्या. खोपोली गावातील काटरंग परिसरातील प्रथमेश सोसायटीच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या विद्युत पोलवर मोठा वृक्ष कोसळल्यामुळे विद्युत पोल कोसळला. झाडांच्या फांद्या खिडक्यांतून घुसल्यामुळे काहींच्या घरांचे किरकोळ  नुकसान झाले. खालापूर तालुक्यातील सारसन गावात राहणारे अशोक कांबळे यांच्या घरावर मोठा वृक्ष कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले. खोपोली शहरातील लघु औद्योगिक वसाहतीत असलेल्या हायटेक कंपनीला विद्युतपुरवठा करणारे तीन विद्युत पोल कोसळल्यामुळे कंपनी बंद पडली आहे. हाळबुद्रुक परिसरातही अनेक घरांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. आपदग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकरांनी व  प्रभारी मुख्याधिकारी दीपक आकडे यांनी भेटीत दिली. आपद्ग्रस्तांचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येतील. शासकीय नियमाला अधीन राहून आपदग्रस्तांना जिल्हाधिकारी होनाजी जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानभरपाईची रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रभारी मुख्याधिकारी तथा खालापूरचे तहसीलदार दीपक आकडे यांनी शेवटी स्पष्ट केले.