युवकांतील सकारात्मक मूल्येच गांधीजींचे राष्ट्र निर्माण करतील - राजेंद्र गावित Print

ठाणे,
आजच्या तरुण युवकांतील सकारात्मक मूल्यांची जपणूक करून त्याला मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यात परिवर्तन घडविल्यास महात्मा गांधींच्या स्वप्नातील अहिंसक राष्ट्र निर्माण होऊ शकेल, असे विचार राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी चिंचणी येथे व्यक्त केले.
चिंचणी के. डी. हायस्कूलच्या पटांगणात चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने युवक बिरादरी (भारत) मुंबई यांनी ‘उडान’ या व्यवसाय मार्गदर्शन शाळेचे तसेच ‘एक सूर एक ताल’ हा कार्यक्रम आणि युवक बिरादरीच्या नामवंत कलाकारांनी ‘सदी की पुकार’ या हिंदी व मराठी गाण्यांचा नृत्य आणि संगीतमय कार्यक्रम सादर केला. त्यात आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित विशेष अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला दुसरे विशेष अतिथी म्हणून युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह, तर अध्यक्षस्थानी चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रजनीकांतभाई श्रॉफ होते. या वेळी युवक बिरादरीचे महासंचालक आशुतोष शिर्के, मुख्याध्यापिका नयना भट, युवक बिरादरी तारापूर-चिंचणीचे अध्यक्ष दीपक दवणे आणि शेकडो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी राजेंद्र गावित यांनी युवक बिरादरीच्या भारत निर्माण दूत प्रतिज्ञा अभियान संकल्प देऊन ‘एकला चालो रे’ची संकल्पना स्पष्ट केली.
या वेळी दुसरे विशेष अतिथी पद्मश्री क्रांती शाह म्हणाले की, देशात १५ कोटी युवक रोजगाराच्या शोधात आहेत. भारतातील युवक नोकरीसाठी नेत्यांच्या दारात उभे असतात, तर चीनमध्ये परिस्थिती उलट आहे. चीन जगाच्या नऊ टक्के उत्पादन करीत आहे. ३५ कोटींची लोकसंख्या असलेल्या भारताची लोकसंख्या आता १२० कोटींवर पोहोचली आहे. युरोपमध्ये आणि अमेरिकेत आर्थिक मंदीने अर्थव्यवस्था कोलमडली असताना भारत त्यावर ताठ मानेने उभा आहे. शिक्षणाचा पुढचा भाग आपल्यालाच पेलावा लागणार आहे. गावागावात ‘एक सूर एक ताल’ घडवून संस्कार घडविण्याची जरुरी आहे.