सरस्वती, लक्ष्मीसह दुर्गेचीही उपासना करा Print

*  शरद पवार यांचे युवतींना आवाहन
*  ४५ हजारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवती मेळावा
अमिता बडे
औरंगाबाद
सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गेचीही उपासना करा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तरुणींना देतानाच आत्मभान आलेल्या स्त्रिया उत्तमपणे राजकारण करू शकतील, असा विश्वास व्यक्त केला. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रवादी युवती काँग्रेस मेळाव्याच्या ५० व्या आणि समारोपाच्या सोहळ्यात ते बोलत होते. येथील देवगिरी महाविद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या मेळाव्याला राज्यातून सुमारे ४५ हजार युवती, महिला उपस्थित होत्या.
समाजातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी असलेली फीमधील सवलतीची मर्यादा वाढविण्याचा विचार असून त्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती मी स्वत: घेईन. त्यानंतर ही मर्यादा साडेचार लाखांपर्यंत करण्याचा प्रस्ताव स्वत: राज्य सरकारकडे पाठवीन, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.
नवी दिल्लीत होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्ताराला उपस्थित न राहता राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यासाठी पवार उपस्थित राहिले. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या युवतींना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, समाजाला जागृत करायचे असेल तर सर्वप्रथम महिलांमधील आत्मशक्ती जागृत करणे आवश्यक आहे. त्यांच्यात आत्मभान आले की त्या समाजकारण आणि राजकारण उत्तम प्रकारे करू शकतील. हे आत्मभान आल्यानंतर त्यांना योग्य संधी देण्याची गरज आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निश्चितपणे प्रयत्न केले जातील.
युवतींमध्ये आत्मविश्वास आणि स्वत:ची नव्याने ओळख करून देण्याचे काम युवती काँग्रेसच्या माध्यमातून केले जात आहे. आतापर्यंत राज्यभरात घेण्यात आलेल्या ५० मेळाव्यांना तरुणींनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तो कौतुकास्पद असल्याचे नमूद करून पवार म्हणाले, यातून पुढे आलेल्या युवतींनी इथे न थांबता अखंडपणे काम करावे. त्यांनी भविष्यात आपल्याला काय करायचे आहे, याचा नियोजनबद्ध आराखडा तयार करून त्या दृष्टीने कामकाज करावे, असा सल्लाही त्यांनी या वेळी आवर्जून दिला. प्रत्येक मुलीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. सरस्वतीची उपासना केली की आपसूक लक्ष्मीही प्रसन्न होते. त्यामुळे मुलींनी सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गेची उपासना आवर्जून करावी, यातूनच ती अधिकाधिक आत्मनिर्भर होऊ शकेल.
युवती काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस अशा विविध माध्यमांतून महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्याचे आवाहन करून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमित्ताने राज्यातील युवतींना एक उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. त्यांनी या व्यासपीठाचा उपयोग करून स्वत:ला सक्षम बनवावे. युवतींना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा राष्ट्रवादी हा राज्यातील पहिला पक्ष आहे.
मेळाव्याच्या मार्गदर्शक खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यांच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यांत फिरले. त्यातून आपल्याला खूप काही शिकता आले. ग्रामीण भागातील मुलींना नेमक्या समस्या काय आहेत, हे जाणून घेता आले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्य़ात झालेल्या मेळाव्यांमधून त्यांच्याशी संवाद साधताना या प्रश्नांचे  गांभीर्य लक्षात आले. यामध्ये हुंडापद्धती, छेडछेडी, स्त्री-भ्रूणहत्या, एसटीच्या प्रवासात येणाऱ्या समस्या अशा विविध समस्या त्यांना भेडसावत असल्याचे कळले. आणि मग त्यातून राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा १२ कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमाची अंमलबजावणी १२.१२.२०१२ पासून करणार आहोत.
 मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या मुलींशी सुप्रिया सुळे यांनी उत्स्फूर्त संवाद साधला. या वेळी मुलींनी हुंडापद्धती, छेडछाड तसेच शिक्षण आणि विजेसंदर्भात विविध प्रश्न मांडले. या प्रश्नांची उत्तरे खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील आणि  उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि या मेळाव्याचे आयोजक राजेश टोपे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ते म्हणाले, महाविद्यालयांमधील विद्याíथनींना रोज छेडाछेडीच्या घटनांना सामोरे जावे लागते. त्याला आळा घालण्यासाठी महाविद्यालयांच्या सहकार्याने छेडछाडमुक्त महाविद्यालये अभियान लवकरच राबवले जाईल.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ५०व्या मेळाव्याला राज्य सरकारमधील पक्षाचे बहुतेक सर्व मंत्री, वरिष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या सर्वामध्ये शिवानी मेहेत्रे या मुलीने सादर केलेला ‘मी जिजाऊ बोलते’ हा प्रवेश लक्षवेधी ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहाव्या वर्धापन दिनी १० जून २०१२ रोजी मुंबईत झालेल्या सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना करण्यात आली. याचे मार्गदर्शकत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात विविध ठिकाणी ४९ मेळावे घेण्यात आले. त्यातून सुमारे ५०० मुली निवडण्यात आल्या असून त्यांना राजकीय प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे या वेळी सांगण्यात आले.    

पाच टर्म बारामती
मेळाव्याला तरुणींकडून मिळणारा मोठा प्रतिसाद आणि यानिमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांना मिळत असलेला पािठबा हा विषय मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा चच्रेत आला. गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणातही सक्रिय होण्याची चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना थेटच विचारले असता, राज्याच्या राजकारणात येण्याचा आपला कोणताही मनसुबा नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. पुढच्या पाच टर्मसाठी आपल्याला बारामती लोकसभा मतदार संघातूनच उमेदवारी दिली जावी, अशी मागणी पक्षाकडे करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहता नजीकच्या काळात पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली जाण्याची शक्यताही त्यांनी एका प्रश्नावर फेटाळून लावली.

जबाबदारी वाढली आहे - सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस युवती मेळाव्याला राज्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यांमधून तरुणींनी जे प्रश्न मांडले, ते अत्यंत हृदयस्पर्शी आहेत. त्यांच्या या समस्यांची कल्पना आपण कधीच करू शकत नाही. या मेळाव्याच्या निमित्ताने मी गेल्या तीन महिन्यांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यांत फिरले. त्यातून त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्या पूर्ण करण्याची माझी आणि माझ्या पक्षाची जबाबदारी आहे. त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करणे ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीचे कधी कधी दडपण येत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. पण या दडपणातूनच काही चांगले हाती लागेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.बारामती, जळगाव, जालना, िहगोली, सांगली, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, भिवंडी, ठाणे, सिंधुदुर्ग अशा राज्याच्या कानाकोपऱ्यांत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या झालेल्या मेळाव्यांमधून सुमारे ५०० तरुणींचे नेतृत्व समोर आले आहे. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्याचे नवीन नेतृत्व दडलेले आहे. त्यांना राजकारणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.