नाशिकमध्ये आजपासून ‘मॅनेजमेंट ट्रायो २०१२’ Print

प्रतिनिधी
नाशिक
महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित पंचवटीतील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च यांच्या वतीने सोमवारपासून ‘मॅनेजमेंट ट्रायो २०१२’ उपक्रमास प्रारंभ होत असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. व्ही. एस. मोरे यांनी दिली. तीनदिवसीय कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ भारतात थेट परकीय गुंतवणुकीमुळे होणाऱ्या परिणामांवर चर्चा करणार असून व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजता माजी मंत्री विनायकदादा पाटील आणि जिंदाल सॉ कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक अजय विद्या भानू यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. थेट परकीय गुंतवणुकीमुळे कृषी क्षेत्रात होणारे बदल आणि परिणाम यावर शेतीविषयक अभ्यासक डॉ. गिरधर पाटील, विमा क्षेत्रात गुंतवणुकीला दिलेल्या परवानगीमुळे होणारे बदल याविषयी अविवा इन्शुरन्सचे चेतन शहा, तर किराणा उद्योगात परकीय गुंतवणुकीच्या शिरकाव्यामुळे होणाऱ्या परिणामांविषयी किराणा व्यापारी संघटनेचे प्रफुल्ल संचेती हे भाष्य करणार आहेत. मंगळवारी लघुउद्योग विभागाचे माजी संचालक सुरेश वाघ हे भारतीय उद्योगांवर होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता अर्थतज्ज्ञ डॉ. व्ही. एम. गोविलकर हे उपक्रमांचा समारोप करणार असून या वेळी त्यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण होणार आहे.