‘इंडो-यूएस इमर्जन्सी मेडिसीन’ परिषदेचा समारोप Print

प्रतिनिधी
नाशिक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया यांच्या वतीने येथे आयोजित ८ व्या इंडो-यूएस इमर्जन्सी मेडिसीन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा तिसरा दिवस विविध विषयांवरील चर्चासत्राने गाजला. तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या या परिषदेचा रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप झाला.
समारोपप्रसंगी व्यसपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर, फिजिशियन ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. नारायण देवगावकर, डॉ. सागर गळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. जामकर यांनी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या उपस्थितीमुळे परिषदेमध्ये अनेक नवनवीन विषयांचा ऊहापोह करण्यात आल्याचे सांगितले. डॉ. देवगावकर, डॉ. गळवणकर, अमेरिकेच्या डॉ. केली पी. ओकिफ, डॉ. बोनी आक्र्युला यांनी मार्गदर्शन केले. परिषदेमध्ये संपूर्ण भारतातून सहभागी झालेल्या विविध वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक व तज्ज्ञांनी आरोग्य क्षेत्रातील आजार, लक्षणे व उपचार यांवर वैशिष्टय़पूर्ण सादरीकरण केले. व्याख्यान सत्रांदरम्यान पुण्याचे काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय, नवी मुंबईचे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांसह बडोदा, लखनौ, नवी दिल्लीचे ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिटय़ूट, चंदीगड, अहमदाबाद या आठ वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना आठ विविध गंभीर स्वरूपाचे आजार कार्यक्रमाप्रसंगी चर्चा करण्याकरिता दिले असता संबंधित विद्यार्थ्यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे अचूक रोगनिदान व त्यावरील उपचार यावर अल्पवेळात काढलेल्या निष्कर्षांला परीक्षकांनी दाद दिली.
लहान मुलांतील हृदयविकार विषयावर मुंबईचे डॉ. एम. निंबाळकर, ट्रॉमा क्रिटिकल केअर या विषयावर अमेरिकेतील द ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीचे संचालक स्टॅन स्टाविकी, डॉ. ममता स्वरूप, डॉ. शेरविन पी. स्क्रॅग, डॉ. डेव्हिड बाहनेर, डॉ. लारा मुरे, म्डॉ. स्टेफनी गोर्डी यांच्या नियोजनाखाली कार्यशाळा झाली. लखनौचे डॉ. संदीप साहू यांचे पाठीचे दुखणे, त्यांची कारणे व त्यावरील तातडीचे उपचार या विषयावर, नवी
दिल्लीचे डॉ. तेज प्रकाश सिन्ह यांचे ‘फ्रॅक्चरमध्ये सोनोग्राफीची उपयुक्तता’ या विषयावर, डॉ. कमल किशोर यांचे अपघातानंतरचे उपचार या विषयावर, डॉ. सी. एस. प्रकाश यांचे, पटियाला येथील डॉ. सुखमिंदर बाजवा, हैद्राबाद येथील डॉ. अशोक उपाध्यय, सालेमचे डॉ. सेन्थिल कुमारन यांची व्याख्याने झाली. यानंतर अमेरिका येथील डॉ. केले पी. ओकिफ यांच्या नियोजनाखाली एक प्रश्नमंजूषा झाली.