नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना १२,१११ रुपये सानुग्रह अनुदान Print

प्रतिनिधी, नाशिक
नाशिक महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना येत्या दिवाळीत १२,१११ रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महापौर यतीन वाघ यांनी सोमवारी जाहीर केला. शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि सफाई कामगारांनाही एवढीच रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. महापालिकेच्या तब्बल सात हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होईल.
दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा म्हणून म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेने पाठपुरावा चालविला होता. संघटनेने यंदा १७ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. सानुग्रह अनुदानाची रक्कम किती असावी, यावर बराच खल झाल्यानंतर अखेर १२,१११ रुपयांवर सहमती झाली. महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन महापौरांनी तडजोड करण्याची विनंती केली होती. त्यास कामगार सेनेने सहमती दर्शवून गतवर्षीच्या तुलनेत एक हजार रुपयांची वाढ मान्य केली, असे संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी सांगितले. सानुग्रह अनुदानाचा लाभ तब्बल सात हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. महापालिका आस्थापनावर ५ हजारहून अधिक कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. तर शिक्षक, अंगणवाडी सेविका व हंगामी तत्त्वावरील कामगार असे मिळून १९०० कर्मचारी आहेत. सानुग्रह अनुदान देताना कायमस्वरूपी व हंगामी असा दुजाभाव न करता सर्वाना समान रक्कम दिली जावी, असा आग्रह संघटनेने धरल्याचे अ‍ॅड. सहाणे यांनी नमूद केले. त्यास महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वाना १२,१११ रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले. या वेळी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, सभागृह नेत्या सुजाता डेरे, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते. गतवर्षी सानुग्रह अनुदानाची ही रक्कम ११,१११ रुपये होती. त्यात एक हजाराने वाढ करण्यात आली आहे. सानुग्रह अनुदानाच्या या निर्णयामुळे महापालिकेवर जवळपास १० कोटींचा बोजा पडणार आहे.