महागाई व भ्रष्टाचाराविरुद्ध ‘जनराज्य’चा मोर्चा Print

वार्ताहर, मालेगाव

महागाई व भ्रष्टाचाराविरुद्ध जनराज्य आघाडीतर्फे येथे सोमवारी मोर्चा काढण्यात आला. या वेळी आघाडीचे कार्याध्यक्ष अद्वय हिरे यांनी सर्वच पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांची ‘चोर’ अशी संभावना केली. सर्वच पक्ष स्वार्थी झाले असून त्यांनी जनतेचे शोषण सुरू केल्याने त्यांच्यावर आपला विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आघाडीतर्फे स्वतंत्रपणे लढाई सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला. येथील उपकार चित्रपटगृहापासून मोर्चाला सुरुवात झाली. महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी हिरे यांनी राज्य व केंद्रातील आघाडी सरकारच्या जनविरोधी धोरणावर प्रखर हल्ला चढविला. निवडणुकीत दिलेली कोणतीच आश्वासने या लोकांनी न पाळल्याने जनतेचा भ्रमनिरास झाला असून जनतेमधील हा असंतोष व्यक्त करण्यासाठी जनराज्यतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. डिसेंबर २०१२पर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन कसे फोल ठरले, खासगी क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीमुळे शेतकरी व सामान्यजनांची कशी वाताहत होणार आहे, घरगुती गॅस सिलिंडरवर मर्यादा आणण्याच्या धोरणामुळे गरीब जनतेची होणारी घालमेल, मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी होणारा वेळेचा अपव्यय यांसारख्या मुद्दय़ांना त्यांनी या वेळी स्पर्श केला.
मालेगाव जिल्हा निर्मिती होऊ नये म्हणून यापूर्वी काही लोकांनी ‘खोडा’ घातला होता. मात्र सद्यस्थितीत पालकमंत्री छगन भुजबळ यांचा त्याला अडथळा असल्याचा आरोप अद्वय हिरे यांनी केला. गिरणा खोऱ्याचे हक्काचे असलेले मांजरपाडय़ाचे पाणी येवल्याकडे वळविणाऱ्या भुजबळांनी या खोऱ्यासाठी मांजरपाडा दोन हा प्रकल्प राबविण्याची हमी दिली होती. मात्र मांजरपाडा एकचे काम ९५ टक्के पूर्ण होत आले असताना मांजरपाडा दोन प्रकल्पास अद्याप मंजुरीही नसल्याचे त्यांनी सांगितले.
भुजबळांनी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहनही हिरे यांनी केले. या वेळी आघाडीचे तालुकाध्यक्ष पवन ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय वाघ, नगरसेवक प्रा. रिजवान खान, आदिवासी एकलव्य संघटनेचे राज साळवे यांची भाषणे झाली. मोर्चाची तयारी तसेच लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हिरे यांनी महिन्यापासून धुळे व नाशिक जिल्ह्य़ांतील विविध गावांमध्ये दौरे केले होते.