फणसाड अभयारण्यात गिधाडांचे ‘रेस्टॉरंट’ Print

हर्षद कशाळकर, अलिबाग

मुरुड तालुक्यात फणसाड अभयारण्यात वनविभागाकडून सध्या गिधाड संवर्धन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाला वल्चर रेस्टॉरंट असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाला आता गिधाडांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून अभयारण्य परिसरातील गिधाडांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
 मृत जनावरांच्या विघटन प्रक्रियेत गिधाडे महत्त्वाची भूमिका बजावत असतात, म्हणून त्यांना निसर्गाचे सफाई कामगार म्हणूनही संबोधले जाते. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे गिधाडाच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शहरी भागातून आता गिधाड दिसणेही दुर्मिळ झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन फणसाड अभयारण्यात गिधाड संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पाला वल्चर रेस्टॉरंट असे नाव देण्यात आले आहे. गिधाडांचे कुपोषणामुळे मृत्यू होऊ नये म्हणून वल्चर रेस्टॉरंट ही संकल्पना राबविली जात आहे.
अभयारण्याला लागून असणाऱ्या गावांची या प्रकल्पासाठी मदत घेतली जात आहे. या गावांमध्ये एखादे जनावर मेले तर त्याचे मृत शरीर अभयारण्यात आणले जाते. नंतर ते अभयारण्यातील माळरानावर आणून टाकले जाते. त्यामुळे गिधाडांना सहज अन्नाची उपलब्धता होते. या वल्चर रेस्टॉरंट प्रकल्पाला आता गिधाडांकडूनही चांगला प्रतिसाद मिळायला लागला आहे. सुरुवातीला या परिसरात १५ ते २० गिधाडे आढळून येत होती. आजही संख्या ५०वर गेली आहे.
भारतात पांढऱ्या पाठीची गिधाडे अत्यंत दुर्मिळ मानली जातात, मात्र सध्या ही गिधाडे केवळ फणसाड अभयारण्यात पाहायला मिळतात. त्यामुळे या पांढऱ्या पाठीच्या गिधाडांच्या संवर्धनाचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जातो आहे. अभयारण्यातील फणसाड व्हॅली गिधाडांची १५ ते २० आढळून येत आहेत. इथे गिधाडांचे ब्रीडिंगही सुरू झाले आहे. त्यामुळे अभयारण्याशेजारील गावांनी मृत जनावरे उपलब्ध करून दिली तर देशातील सर्वात मोठा गिधाड संवर्धन प्रकल्प फणसाडमध्ये सुरू होईल, असा विश्वास फणसाड अभयारण्य प्रशासनाने व्यक्त केला आहे.