औरंगाबाद महापौरपदी शिवसेनेच्या कला ओझा, उपमहापौरपदी भाजपचे संजय जोशी Print

प्रतिनिधी, औरंगाबाद

काँग्रेस व शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने जोर लावल्यानंतरही औरंगाबाद महापालिकेवर अखेर शिवसेनेनेच वर्चस्व कायम राखले. महापौरपदी शिवसेनेच्या कला ओझा, तर उपमहापौरपदी भाजपचे संजय जोशी निवडून आले. भाजपशी जवळीक असणारे अपक्ष नगरसेवक राजू शिंदे यांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली होती. मात्र, अपक्षांसह मोट बांधण्यात त्यांना अपयश आले. ओझा यांना ५८, तर काँग्रेसच्या फिरदोस फातेमा यांना ४१ मते मिळाली. उपमहापौर संजय जोशी यांना ५६ मते मिळाली, तर अपक्ष नगरसेवक राजू शिंदे यांना ४३ मतांवर समाधान मानावे लागले.
गेल्या दीड महिन्यापासून शहरात नवीन महापौरपदाच्या निवडीची जोरदार चर्चा सुरू होती. अपक्षांनी वेगळी चूल मांडल्याने घोडेबाजारही सुरू झाला होता. काँग्रेस व राष्ट्रवादीनेही जोर अजमावून पाहिला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना महापौर निवडीत लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सूत्रे सोपविली होती. महापौर निवडीच्या पाश्र्वभूमीवर व्यूहरचनेचा भाग म्हणून अपक्षांना लोणावळय़ाची सफर घडविण्यात आली. त्यामुळे शिवसेनेलाही बरीच कसरत करावी लागली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचा महापौर शिवसेनेचाच होईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी खऱ्या अर्थाने सूत्रे हलविली. महापालिकेत शिवसेनेचे ३०, भाजपचे १४, शहर प्रगती आघाडीचे ३, मनसेचा १ आणि अपक्ष १० असे गणित सोमवारी मांडून शिवसेनेने विजय मिळविला.
 आमदार प्रदीप जैस्वाल नुकतेच शिवसेनेत परतल्याने त्यांचे समर्थक ३ नगरसेवक शिवसेनेलाच मतदान करणार होते. त्यामुळे ५१ सदस्यांची बेरीज शिवसेनेकडे होती. उर्वरित सदस्यांपैकी काही अपक्ष गाठीला बांधण्यासाठी ‘विशेष’ प्रयत्न केले गेले. मावळत्या महापौर अनिता घोडेले, पुष्पा अनिल पगारे, कीर्ती शिंदे, आगा खान, मेहरुन्निसा बेगम, ज्योती खिल्लारे, संगीता अहिरे, कैलास गायकवाड, विजयेंद्र जाधव व सुरेंद्र कुलकर्णी या १० अपक्षांनी शिवसेनेला साथ दिली.
शिवसेनेला मिळालेल्या मतांपेक्षा दोन मते भाजपच्या पारडय़ात कमी पडल्याचे स्पष्ट झाले. संजय जोशी यांना ५६ मते मिळाली. मेहरुन्निसा बेगम व विजयेंद्र जाधव या दोघांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले नाही. या संदर्भात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, की शिवसेनेने सर्वाना संपर्क साधला होता. भाजपकडून या दोघांना आमच्या बाजूने मतदान करा, अशी विनंती झाली नसेल.
 या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने पैशांचा बराच वापर केला. जातीयवादही पसरवला. पण आम्ही प्रयत्न केले आणि विजय आमच्या बाजूने झाला. पुढील अडीच वर्षे कला ओझा महापौरपदी राहतील.