कंटेनर उलटल्याने पुणे-मुंबई वाहतूक पाऊण तास ठप्प Print

प्रतिनिधी, पुणे
पुणे-मुंबई महामार्गावर खोपोलीजवळ कडप्पाच्या फरशा घेऊन जाणारा कंटेनर उलटल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पाऊण तास ठप्प होती. क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने एक कंटेनर कडप्पाच्या फरशा घेऊन जात होता.

दुपारी दोनच्या सुमारास खोपोलीजवळील एका वळणावर फरशांचे ओझे एका बाजूस झाल्यामुळे कंटेनर एका बाजूस कलंडला. या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही. मात्र या अपघातामुळे  मुंबईकडे जाणारी वाहतूक पाऊण तास खोळंबली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावणेतीनच्या सुमारास क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.