पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात १२ विद्यार्थी जखमी Print

नाशिक,  प्रतिनिधी
सातपूर येथील समता नगर परिसरात मंगळवारी सकाळी मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी १२ ते १५ जणांना चावा घेऊन जखमी केले. त्यात बहुतांश शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून या सर्वावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही महापालिका त्याची दखल नसल्याची परिणती या हल्ल्यात झाल्याची स्थानिकांची भावना आहे. सातपूर परिसरात कुत्रे चावण्याची वर्षांतील ही तिसरी घटना असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. मंगळवारी सकाळी विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची गडबड सुरू असताना दोन कुत्र्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना त्यांनी आधी लक्ष्य केले. त्यांचा हल्ला चुकवत दुचाकीस्वारांनी पळ काढला. त्यानंतर पिसाळलेल्या कुत्र्याने समतानगर बसस्थानकासमोर लक्ष्मी मंदिराजवळील रस्त्याने ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांकडे मोर्चा वळविला. कुत्र्याच्या हल्ल्यात अथर्व दिलीप वाघ (८), उत्कर्ष दत्तात्रय भोईटे (११), मनीषा प्रशांत बोरसे (७), पार्थ अभय पुलतांबे (६), समीर शेख (१४), रुद्र सुधीर महाले (२) आणि नलिनी टेंबकर (५८) हे जखमी झाले. विद्यार्थ्यांच्या कान, नाक, डोळे व पायांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. अटकाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांवरही कुत्र्याने धाव घेतल्याने काही जणांना दुखापत झाली. संतप्त नागरिकांनी दगडांचा मारा करून कुत्र्याला ठार केले. या हल्ल्यात जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर महापालिकेची उदासीनता पुन्हा एकदा निदर्शनास आली आहे. महापालिकेकडे अद्याप पाळीव कुत्र्यांची नोंदणी, मोजणी झालेली नाही. तसेच श्वान निर्बीजीकरणाचे कामही बंद आहे.