आंबोली मार्गावर आपत्कालीन यंत्रणेची रंगीत तालीम Print

वार्ताहर, सावंतवाडी
सावंतवाडी ते आंबोली मार्गावरील बुर्डी पुलाजवळ भीषण अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंगळवारी आपत्कालीन यंत्रणेच्या रंगीत तालमीसाठी दिल्यावर सर्व यंत्रणा सतर्क बनली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व यंत्रणेकडे फोन खणखणला, पणप्रत्यक्ष घटनास्थळी रंगीत तालीम सुरू असल्याने सर्वानीच श्वास घेतला.
गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आपत्कालीन यंत्रणा किती सतर्क आहे हे पाहिले जात आहे. त्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सर्वाना सतर्कता राखण्याचे निर्देश देत आहेत.
सावंतवाडी ते आंबोली रस्त्यावरील बुर्डी पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघेजण ठार झाले असल्याने पोलीस, आरटीओ, बांधकाम खाते, तहसीलदार कार्यालय असे सर्वाना कळविण्यात आले.
बुर्डी पुलाजवळ व पुलाखाली तिघांना झोपविण्यात आले. शेजारी रुग्णवाहिका ठेवण्यात आली. अपघातात ठार झालेल्यांना रक्ताचा रंग टाकून झोपविण्यात आले होते. फोनाफोनी होताच सारेच धावले.
बांधकाम खात्याचे उपअभियंता एन. बी. नवखंडकर, आरटीओचे अधिकारी घटनास्थळी धावले. पोलीस, तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारीही होते. माजी जिल्हा परिषद सदस्य मंगेश तळवणेकर व तलाठी शेणई यांनी आपत्कालीन यंत्रणेच्या रंगीत तालमीसाठी खास भूमिका बजावली.
या रंगीत तालीमप्रसंगी सर्वच खात्याची यंत्रणा बुर्डी पुलाजवळ धावली तेव्हा आपत्कालीन यंत्रणेची रंगीत तालीम असल्याचे उघड झाले. उशिराने आलेल्या खात्याच्या अधिकाऱ्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.