स्थानिक विकास निधीतून आठ कोटीची कामे प्रस्तावित - खा. भुजबळ Print

प्रतिनिधी, नाशिक
स्थानिक विकास निधीतून नाशिक लोकसभा मतदार संघात शिल्लक रकमेसह यंदा आठ कोटीची कामे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती खा. समीर भुजबळ यांनी दिली आहे. त्यामध्ये शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालयांना संगणक आणि प्रिंटर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी ४० हजार रुपये देण्यात येणार आहे. शंभर टंचाईग्रस्त गावांना हातपंप वाटप करण्यासाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय आणि देवळाली छावणी मंडळाच्या रुग्णालयास ‘इनक्युबेटरची’ ची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विविध ग्रंथालयांना मनशक्ती केंद्राची सुमारे दहा लाख रुपयांची ग्रंथसंपदा देण्यात येणार आहे.
शंभर शाळा व महाविद्यालयांच्या वाचनालयास प्रत्येकी दोन हजार २५०, मतदार संघातील १०८ सार्वजनिक ग्रंथालयांना सात हजार ४०० रुपये देण्यात येणार आहे. नाशिक, सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व आरोग्य संस्थांना बायोमेट्रीक यंत्र देण्यात येणार आहे. शहर व परिसरासाठी एक कोटी ६९ लाख रुपयांच्या चौदा विकासकामांची नावे नुकतीच जिल्हा नियोजन कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. बस थांबा, सभामंडप, उद्यान विकसित करण्यासाठीही निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक, सिन्नर, या तालुक्यांतील विविध गांवाना आवश्यक सुविधांसाठी निधीची तरदूत करण्यात आली आहे. त्यात दशक्रिया विधीगृह, सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, स्मशानभूमी, घंटागाडी, शौचालये, बस पिक अप शेड, वाचनालय व अभ्यासिका यांसह इतरही अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.