समस्यांच्या गर्तेतून औशाला नवी झळाळी! Print

प्रदीप नणंदकर, लातूर
मोकाट जनावरे, जागोजागी अस्वच्छता, डुकरांचा सुळसुळाट, पाहावे तिकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या, घाण पाण्याची डबकी असे दीड महिन्यांपूर्वी औसा शहराचे बकाल रूप होते. या पाश्र्वभूमीवर गेल्या १ सप्टेंबरला दापोलीहून बदलून आलेल्या रामदास कोकरे यांनी औसा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली आणि आपल्या कर्तृव्याने ही परिस्थिती बदलून दाखवली़ कोकरे यांनी दापोली पालिकेत केलेल्या कामांची राज्य सरकारने दखल घेऊन दापोली पॅटर्न राज्यभर राबवण्याचे आदेश नगरपालिकेला दिले.
कोकरे यांनी शहरात फिरून एकेक समस्या सोडवण्याचा कृतिआराखडा तयार केला. प्लॅस्टिक पिशव्या मुक्त करण्यास व्यापाऱ्यांची बैठक घेत अनुकूल वातावरण तयार केले. महिला बचतगटाची बैठक घेऊन कापडी व कागदी पिशव्या तयार करण्याबाबत सूचना दिल्या. लोकांना, किरकोळ विक्रेत्यांना भूमिका समजावून सांगितली व नंतर दंड वसुली मोहीम सुरू केली. महिनाभरानंतर आता औसा शहरात प्लॅस्टिकची पिशवी पाहायलाही मिळत नाही.
शहरात मोकाट जनावरांची समस्या मोठी होती. कोकरे यांनी जनावरांची गणना करण्यासाठी त्यांना क्रमांक दिले. त्यातून जनावरांच्या मालकांची माहिती उपलब्ध झाली. पुन्हा रस्त्यावर जनावरे दिसल्यास पालिका कोंडवाडय़ात न ठेवता त्याची विक्री करण्याची तंबी दिली. त्यामुळे जनावरे सांभाळणे शक्य नव्हते त्यांनी आपली जनावरे विकून टाकली. त्यातून रस्त्यावरील मोकाट जनावरे कमी झाली. रात्री आजूबाजूच्या शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी झाला. शहरात डुकरांचे प्रमाणही वाढते होते. कैकाडी समाजाच्या मंडळींची बैठक घेऊन डुकरांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सहभाग घेतला. पहिल्या टप्प्यात ४०० डुकरे शहराबाहेर नेऊन या समाजाने विकून टाकली.
डिजिटल बोर्ड जाहिराती कराविनाच कोणत्याही चौकात लावल्या जात होत्या. डिजिटल फलकांना कर घेता येतो, याची वार्ताही पालिकेला नव्हती. कोकरे यांनी सुरुवातीला सर्व फलक काढून टाकले. आता सात दिवसांसाठी रीतसर परवानगी घेऊन व कर भरूनच फलक लावले जात आहेत. त्यातून पालिकेला उत्पन्न मिळते आहे व लोकांना शिस्त लागते आहे.
शहरात शून्य कचरा व्हावा, यासाठी रोजच्या रोज रस्ते साफ करून कचरा गोळा केला जातो. एक वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. वाहन उपलब्ध झाले तर दिवाळीपासूनच कचरामुक्त औशाचे स्वप्न साकारणार आहे. नागरिकांना घरातील सांडपाणी पालिकेच्या गटारीत सोडून दिले की आपली जबाबदारी संपली, असे वाटत असते. त्यामुळे लोकांना सांडपाणी जमिनीत मुरवणे याची सवय लावली पाहिजे. त्यामुळे शक्य त्या ठिकाणी शोषखड्डे करणे याची मोहीम घेतली जात आहे. शहरात दरुगधी होणार नाही, डासमुक्त शहर अशी कल्पनाही रामदास कोकरे मनी बाळगून काम करीत आहेत.