रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती भोईर यांची न्यायालयासमोर शरणागती Print

प्रतिनिधी, अलिबाग
गेल्या दीड महिन्यापासून फरार असणाऱ्या जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी आज अखेर शरणागती पत्करली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज दिलीप भोईर आणि त्यांच्या सहा सहकारी अलिबागच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना उद्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्याचे आदेश दिले.  ११ सप्टेंबरला चोंढी येथे असलेल्या व्हिन्टेक कॉम्प्युटर येथे घुसून जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर आणि इतर ३८ जणांनी हल्ला केला होता. या प्राणघातक हल्ल्यात विजय थळे आणि इतर सहाजण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात दिलीप भोईर यांच्यासह ३८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून दिलीप भोईर आणि इतर सहाजण फरार होते. दरम्यानच्या काळात अलिबागच्या सत्र न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात भोईर यांनी अटकपूर्व जामीन मागितला होता. मात्र दोन्ही न्यायालयाने तो फेटाळला होता. अखेर भोईर यांनी आज अलिबागच्या जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरणागती पत्करली. न्यायालयात हजर होताना त्यांनी अंतरिम अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. मात्र जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांनी ती फेटाळली. भोईर यांच्या सात आरोपींना उद्या सकाळी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिलेत.