‘त्या’ वादग्रस्त उपअभियंत्याची सक्तीचा रजेवर रवानगी, ठेकेदारांचे उपोषण स्थगित Print

रत्नागिरी  
येथील सार्वजनिक बांधकाम- उपविभाग क्र. १ चे उपअभियंता बी. जी. गिते यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने ठेकेदारांनी आपले साखळी उपोषण सायंकाळी मागे घेत असल्याचे जाहीर केले. खासदार, आमदारांच्या स्थानिक विकास निधीतील कामे जाणीवपूर्वक अडवून ठेवणे, देयके वेळेवर अदा न करणे, वारंवार आर्थिक स्वरूपाची मागणी करणे आदी आरोप ठेकेदारांच्या वतीने उपअभियंता गिते यांच्यावर करण्यात आले होते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही गिते यांच्याविरुद्ध कोणतीच कारवाई न झाल्याने येथील बहुसंख्य ठेकेदारांनी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर साखळी उपोषण करून गिते यांची बदली करण्याची मागणी केली होती. या उपोषणात १०० हून अधिक ठेकेदार सहभागी झाले होते. आमदार उदय सामंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा क्षेत्राध्यक्ष गजानन पाटील, विवेक सुर्वे, काँग्रेसचे बंटी वणजू, समीर झारी आदींनी ठेकेदारांच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यसाठी उपोषणात सहभाग घेतला होता. गिते यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, अन्यथा आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी उपोषणकर्त्यां ठेकेदारांनी केली होती. दरम्यान, अधीक्षक अभियंता विनयकुमार देशपांडे, कार्यकारी अभियंता आर. एम. गोसावी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व उपअभियंत्यांची बदली करणे किंवा सक्तीच्या रजेवर पाठविणे या बाबी आपल्या अधिकारात नसल्याचे सांगितले. त्यानंतर अधीक्षक अभियंता देशपांडे यांनी मुख्य अभियंता के. आर. पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता पवार यांनी गिते यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश दिले. त्यानंतर सायंकाळी उशिरा ठेकेदारांनी आपले साखळी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. या वेळी आमदार उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, किरण सामंत, आदी उपस्थित होते.