हृदयनाथांच्या स्वरांनी रंगली ‘मैत्र जिवांचे’ मैफल Print

प्रतिनिधी, नाशिक
गुलाबी थंडीत कोजागरीच्या चंद्र प्रकाशाने उल्हासित वातावरणात शब्द स्वरांच्या मुक्त उधळणीत नाशिककरांनी कोजागरीचा आनंद लुटला. निमित्त होते पंडित हृदयनाथ मंगेशकर, डॉ. सलील कुलकर्णी आणि राधा मंगेशकर यांच्या ‘मैत्र जिवांचे’ या मैफलीचे. येथील विसे मळ्यातील रामदास उद्यानात नगरसेवक उत्तम कांबळे यांच्या वतीने या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वरांच्या ‘रुणझुणू रुणझुणु रे भ्रमरा’ या रचनेने मैफलीचा प्रारंभ झाला. मंगेशकरांच्या स्वरांवर फिदा झालेल्या रसिकांनी टाळ्यांच्या प्रतिसादात दाद दिली. रसिकांची ‘भ्रमरा.’ वर आरोहची हलकीशी नजाकत घेत त्यांनी स्वीकारली. मैफलीचा नूर बदलण्यासाठी सलील कुलकर्णी यांनी ‘नको करू सखी असा शृंगार’ ही बैठकीची लावणी सादर केली. यानंतर मंगेशकरांनी  ‘जिवाशिवाची बैलजोडी’ सादर करत मैफलीत रंग भरण्यास सुरुवात केली. बच्चे कंपनीच्या खास आग्रहास्तव ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ सादर केले. यानंतर आम्ही ठाकर ठाकर, केव्हा तरी पहाटे, माझ्या सारंगा राजा सारंगा यासह विविध गाणी सादर करण्यात आली. त्यांना संगीत साथ कृष्णा घोटेकर, आदित्य आठवले, विशाल गंधत्वार, रितेश ओवाळ यांनी केली. मधुकर झेंडे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी कार्यक्रमाला आ. जयंत जाधव, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, माजी खासदार माधवराव पाटील, पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल, उपायुक्त साहेबराव पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.