नाशिकमध्ये उद्यापासून महाराष्ट्र शैक्षणिक व व्यवस्थापन परिषदेचे अधिवेशन Print

प्रतिनिधी, नाशिक
मूल्याधिष्ठित गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण, उपाय व व्यवस्थापन या विषयावर वैचारिक मंथन करण्यासाठी पुणे येथील महाराष्ट्र शैक्षणिक, प्रशासन व व्यवस्थापन परिषदेचे १९ वे वार्षिक महाअधिवेशन गोखले एज्युकेशन सोसायटी, एस.एम.आर.के. महिला महाविद्यालय आणि मुंबईचे डॉ. एम.एस.जी. फाऊंडेशन यांच्या वतीने येथील एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयात दोन ते चार नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाअधिवेशनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मीना चंदावरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्ष म्हणून गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी उपस्थित राहतील. उद्घाटनानंतर डॉ. चंदावरकर यांना गोपाळ कृष्ण गोखले महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच डॉ. गोसावी यांचा ७७ वर्षपूर्तीनिमित्त सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी ‘डॉ. मो. स. गोसावी गौरव व्याख्यान २०१२’ होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर, उच्चशिक्षण विभाग उपसंचालक डॉ. मंजुषा मोळवणे उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात मूल्याधिष्ठित व गुणवत्तापूर्ण व्यवसाय, उच्च शिक्षणाच्या नव्या दिशा, मूल्याधिष्ठित व गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण तसेच वैद्यकीय व्यवसायातील नीतिमूल्यता या विषयावर चर्चासत्र, परिसंवाद होणार आहे. या कालावधीत स्वयंप्रेरणा, परिवर्तन, एज्युकेअर, यांसह ‘विद्याश्री’ या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळच्या सत्रात महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीने ‘सूरसंगम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळ सत्रात मूल्याधिष्ठित व गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन शिक्षण, गुणवत्तापूर्ण संशोधन-विचारप्रणाली व अंमलबजावणी या विषयावर परिसंवाद होणार आहे. चार नोव्हेबर रोजी सकाळी परिसंवाद होईल. समारोप यशवंतराव चव्हाण यांचे शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान या विषयावरील परिसंवादाने होईल. यावेळी डॉ. गोसावी यांच्यासह उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. नरेंद्र कडू उपस्थित राहणार आहेत. परिषदेस डॉ. अरुंधती सरदेसाई, आसाम येथील केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नित्यानंद पांडे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरूण जामकर, तज्ज्ञ डॉ. प्रीतेश जुनागडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, परिषद सुरू असतांना महाविद्यालयाच्या आवारात ‘सृजन’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात १० शैक्षणिक संस्था सहभागी होणार असल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. यावेळी समन्वयक डॉ. कविता पाटील, साधना देशमुख, मनीषा राणे उपस्थित होते.