आई व आजीनेच घेतला पाच दिवसांच्या चिमुरडीचा जीव! Print

रत्नागिरी
दुसरीही मुलगीच झाल्याच्या रागातून पाच दिवसांच्या नवजात अर्भकाला जन्मदाती आई व आजीनेच गळा, नाक दाबून ठार मारल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्य़ात संताप व्यक्त होत आहे. तत्पूर्वी या मुलीला फिनेल पाजून तिचे आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला होता. मूळचा बिजापूर येथील श्रीरंग रघुनाथ बिराजदार (३५ वर्षे) हा आरोग्यमंदिर येथील स्टँडर्ड अपार्टमेन्टमध्ये पत्नी संपदा (२७) व आई श्रीमती लिलावती (६५) यांच्यासह राहतो. श्रीरंग हा एमबीए असून तो पल्सग्रीनमध्ये व्यवस्थापक आहे. दुसरीही मुलगीच झाल्याने बिराजदार कुटुंबीय नाराज झाले व या मुलीचा अवघ्या पाच दिवसांचा जीवन प्रवास संपविण्यात आला. २८ ऑक्टोबरच्या रात्री मुलीचा मृतदेह बापाने अपार्टमेन्टच्या आवारातच खड्डा खणून पुरून टाकला व त्या जागेवर तुळस लावून तिची पूजा केली. हा प्रकार अपार्टमेन्टमधील काहींनी पोलिसांना कळविला व त्यातून सारे उघडकीस आले. याप्रकरणी श्रीरंग बिराजदार याच्यासह संपदा व लिलावती बिराजदार यांना अटक केली आहे.