नेटच्या युगातही परीक्षेचा गोंधळ Print

‘बामु’चे महाविद्यालय  ‘एक दिवस’ मागेच!
प्रदीप राजगुरू, औरंगाबाद
एक दिवस पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा एका महाविद्यालयात मात्र पूर्वघोषित वेळापत्रकानुसार आदल्या दिवशीच घेण्यात आली! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (‘बामु’) कार्यकक्षेतील कन्नड तालुक्यात असणाऱ्या महाविद्यालयात अलीकडेच हा प्रकार घडला. या प्रकाराची गंभीर दखल घेत विद्यापीठाने एका समितीमार्फत चौकशी सुरू केली. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी या संदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. विशेष म्हणजे विद्यापीठात एका विषयाचा अधिष्ठाता असलेल्या प्राध्यापकाच्या महाविद्यालयात हा प्रकार घडल्याने या प्रकाराची दबक्या आवाजात, परंतु चवीने चर्चा होत आहे!
काही कारणांमुळे एखाद्या विषयाची परीक्षा एक दिवस पुढे ढकलल्याची पूर्वसूचना लेखी पत्रक व संकेतस्थळावरून देऊनही हा प्रताप घडला! त्याचा बोभाटा होताच चौकशीची चक्रे फिरली. त्यामुळे कारवाईच्या रडारवर कोण याची चर्चा या निमित्ताने आता होत आहे.
विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील सर्व महाविद्यालयांमध्ये बी. एस्सी. तिसऱ्या वर्षांची परीक्षा नुकतीच पार पडली. यातील गणित विषयाची १८ ऑक्टोबरला होणारी परीक्षा काही कारणामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आली. तसे परिपत्रक विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना लेखी व संकेतस्थळावरून पाठविले होते. त्यानुसार विद्यापीठ कार्यकक्षेतील इतर सर्व महाविद्यालयांत ही परीक्षा दुसऱ्या दिवशी (१९ ऑक्टोबर) घेतली गेली. परंतु कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मात्र पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे, आदल्या दिवशीच ही परीक्षा घेतली गेली! दुसऱ्या दिवशी या महाविद्यालयात या विषयाच्या परीक्षा पाहणीस गेलेल्या भरारी पथकाने चौकशी केली असता हे पितळ उघडे पडले. मात्र, घडल्या प्रकारामुळे पथक चांगलेच सर्द झाले. पथकाने या बाबत विद्यापीठास गोपनीय अहवाल दिला असून विद्यापीठानेही या प्रकरणी समितीमार्फत चौकशी सुरू केली. यात दोषी आढळणाऱ्यांवर कोणताही मुलाहिजा न ठेवता कारवाई केली जाईल, असे डॉ. पांढरीपांडे यांनी स्पष्ट केले.
मिळालेल्या माहितीनुसार या विषयाची परीक्षा एक दिवस पुढे ढकलली असल्याचे विद्यापीठाने लेखी व संकेतस्थळावरून ६ दिवस आधीच सर्व संबंधित महाविद्यालयांना कळविले होते. त्यानुसार या सर्व महाविद्यालयांनी १८ऐवजी १९ ऑक्टोबरला या विषयाची परीक्षा घेतली. परंतु कन्नड तालुक्यातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने मात्र ही परीक्षा १८ ऑक्टोबरला घेतली. दुसऱ्या दिवशी या महाविद्यालयात परीक्षा पाहणीस गेलेले विद्यापीठाचे भरारी पथक हा प्रकार निदर्शनास येताच भांबावून गेले. पथकाच्या अहवालानंतर या प्रकाराची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. या महाविद्यालयातील एक प्राध्यापक विद्यापीठात एका विषयाचा अधिष्ठाता आहे. सुरुवातीला हा प्रकार दडपण्याचा व आता चौकशीत काही बालंट नको यासाठी महाविद्यालयातील काहींचा आटापिटा सुरू असल्याचे समजते.    
‘चर्चे’ला नवे ‘खाद्य’!
मध्यंतरी पेपरफुटीच्या प्रकारांनी विद्यापीठातील परीक्षा विभागाविषयी मोठेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यातून काय निष्पन्न झाले, काय कारवाई झाली, तो संशोधनाचा विषय असताना एक दिवस पुढे ढकललेली परीक्षा प्रत्यक्षात आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे आदल्या दिवशी घेण्याचा प्रकार उजेडात आला आहे. साहजिकच सारे आलबेल नाही हे दर्शविणारा हा प्रकार असल्याची तिखट प्रतिक्रिया विद्यापीठ वर्तुळात उमटत आहे.