शहर बस वाहतुकीच्या गलथानपणाविरोधात ‘चला रिव्हर्स’ आंदोलन Print

प्रतिनिधी, नाशिक

शहर बस वाहतुकीसंदर्भात चालक व वाहकांची कमतरता असल्याने सामान्य प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत असल्याचे कारण पुढे करणाऱ्या एसटी महामंडळाचे हे कारण काहीसे खरे असले, तरी दुसरीकडे सध्या चालकांच्या मनमानी कारभाराचा नाहक फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बसत असल्याचे पाहावयास मिळत आहे. शहर व परिसरातील अनेक थांब्यांवर बस रिकाम्या असतानाही चालक गाडी थांबवत नसल्याने इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या नाशिक शाखेच्या वतीने ‘चला रिव्हर्स’ अशा प्रकारे अभिनव आंदोलन छेडण्यात आले असून, बुधवारी विभाग नियंत्रक कैलास देशमुख यांना निवेदन देण्यात आले. बस थांब्यांवर न थांबणाऱ्या बसेसविरुद्ध आंदोलन छेडण्यात आले असून संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून अशा बसेसचा पाठलाग करण्यात येत आहे. या आंदोलनाची दखल घेत विभाग नियंत्रक देशमुख यांनी यासंदर्भात त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, यांच्या सुरळीत व सुरक्षित वाहतुकीसाठी चालक व वाहकांनी आपली जबाबदारी पाड पाडणे आणि सर्व बस थांब्यांवर वेळापत्रक लावण्याची मागणी डॉ. गिरधर पाटील, जितेंद्र भावे, जगबीर सिंग, प्रियदर्शन भारतीय, स्वप्नील घिया, श्वेता पाटील यांनी केली आहे.