डेंग्यूचा फैलाव; राजकीय पक्ष आक्रमक Print

वार्ताहर, धुळे

जिल्ह्य़ातील तीन जणांचा मृत्यू डेंग्यूनेच झाल्याचे जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी बुधवारी स्पष्ट केले. इतर सात जणांच्या मृत्यूचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. महापालिका क्षेत्रात १४ यंत्रांच्या माध्यमातून धुरळणी करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. दुसरीकडे आजार रोखण्यास महापालिकेला अपयश येत असल्याने संतप्त झालेल्या विविध राजकीय पक्षांनी बुधवारी स्वतंत्रपणे मोर्चे काढत संतापाला वाट मोकळी करून दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या वतीने मोर्चे काढण्यात आले. तर मनसेच्या महिलांनी आयुक्तांना बांगडय़ा भेट म्हणून दिल्या.
पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी डेंग्यूची सद्यस्थिती, उपाय योजना आणि खबरदारी याविषयी माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त जीवन सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता, उपजिल्हाधिकारी अशोक करंजकर यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शहरात सात तर ग्रामीण भागात तीन रुग्णांचा डेंग्युसदृश आजाराने मृत्यू झाल्याने यंत्रणा हादरली. खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये साथीच्या आजाराचे सुमारे शंभर रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
महानगरपालिका आणि ग्रामीण भागात प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहेच, परंतु नागरिकांनी स्वत:ही काळजी घ्यावी, पाणी साठविले असल्यास ते झाकून ठेवणे गरजेचे आहे. जिल्ह्य़ात आजवर ७९८ जणांची रक्त तपासणी झाली असून, हिवतापाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४४ रुग्णांना डेंग्युसदृश आजार असला, तरी त्याबाबबत अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, शहरात आजार रोखण्यात हलगर्जीपणा दाखविणारे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे यांच्या वेतनातून ५० टक्के रक्कम कापण्याची मागणी ठरावाद्वारे लोकसंग्रामच्या नगरसेवकांनी केली आहे.