३० सेकंदांत १ लाख दिवे लावणार Print

शिर्डीत दीपोत्सवानिमित्त विश्वविक्रमाची तयारी
वार्ताहर, राहाता

साईबाबांच्या हयातीपासून शिर्डीत दीपावलीच्या दीपोत्सवाला विशेष महत्त्व आहे. या दीपोत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, यासाठी शिर्डीतील साईभक्त लक्ष्मीबाई िशदे चॅरिटेबल ट्रस्टने विडा उचलला आहे. यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी केवळ ३० सेकंदांत तेलाचे एक लाख दिवे लावून हा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. साईभक्त लक्ष्मीबाई यांची नात शैलजा गायकवाड यांच्या हस्ते शिर्डी येथील हॉटेल साई संजीवनीमध्ये तेलाचे नऊ दिवे प्रज्ज्वलित करून या उपक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या वेळी अरुण गायकवाड, संगीता गायकवाड, साईराज गायकवाड, गणेश साळुंके आदी उपस्थित होते.
कोपरगाव येथील गणेश साळुंके यांच्या माध्यमातून गिनीज बुक कार्यालयाकडे या उपक्रमाची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. इतर आनुषंगिक बाबी पूर्ण करण्यात आल्या असून या दीपोत्सवाच्या वेळी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे या ट्रस्टचे अरुण गायकवाड यांनी सांगितले. शिर्डीतील साईनगर मैदानात १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी एक लाख पणत्या व त्यात जवळपास अडीच हजार लिटर तेल वापरण्यात येणार आहे. दिवे ठेवण्यासाठी स्टॅण्ड बनविण्यात येणार असून त्यांच्या १५ रांगा असतील. हे दिवे ३० सेकंदात पेटविण्यासाठी ९ हजार भाविकांची गरज असल्याने या ऐतिहासिक दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी शिर्डी परिसरातील सामाजिक संघटना, गणेश मंडळे यांच्याबरोबरच देशभरातील साईभक्तांना आवाहन करण्यात आले आहे.