दोन महिन्यांपासून पुरवठा विस्कळीत Print

सलाइनच ‘सलाइन’वर!
सुहास सरदेशमुख , औरंगाबाद

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सलाइनच सध्या ‘सलाइन’वर आहे! पेट्रोल, डिझेलचे वाढलेले भाव आणि बाजारपेठेतील सलाइनच्या वाढत्या किमतीमुळे पुरवठादार कंपन्यांनी मागील दोन महिन्यांपासून सलाइनचा पुरवठा थांबविला आहे. ‘अ‍ॅलकॉन पॅटेन्ट्रल’ या सलाइन बनविणाऱ्या कंपनीसमवेत दर करार करण्यात आले होते; परंतु बाजारपेठेतील दर वधारले व अन्य कारणांमुळे सलाइनचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आजही सलाइनचा तुटवडा जाणवत आहे. इतर औषधांचा तुटवडा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत सुरळीत होईल, असे राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या वेगवेगळय़ा आजारांनी ग्रस्त रुग्णांना विविध प्रकारचे सलाइन दिले जाते. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर ‘रिंगर लेक्टेट’, ‘नॉर्मल सलाइन’, ‘डेकस्ट्रोज ०५’ व ‘डीएनएस’ हे सलाइन देऊन त्याद्वारे रक्तवाहिन्यांमधून औषधपुरवठा केला जातो. या औषधांचे दर करार आरोग्य विभागाने केले होते. ‘रिंगर लेक्टेट’साठी १८ रुपये ८५ पैसे असा दर करार होता. सध्या त्याची बाजारपेठेतील किंमत २७ रुपये आहे. ‘नॉर्मल सलाइन’साठी १६ रुपये ७५ पैसे दर करार होता. बाजारपेठेत त्याची किंमत १८ रुपये आहे. ‘डेकस्ट्रोज ०५’ व ‘डीएनएस’ या औषधांच्या किमतीही वाढल्या आहेत. परिणामी, वारंवार पाठपुरावा करूनही सलाइनचा पुरवठा विस्कळीतच आहे. केवळ सलाइनच नाही तर प्रतिजैविकाची संख्या व साठवणूकही कमी असल्याने त्याचा रुग्णसेवेवर विपरीत परिणाम जाणवत आहे. राज्यस्तरावर देण्यात आलेले हे कंत्राट बदलण्यात आल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी ‘बॅक्सस्टर’ कंपनीकडून होणारा पुरवठा विस्कळीत होता, असे अधिकारीही मान्य करतात. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अजूनही पुरेसा या औषधांचा पुरवठा झाला नाही. वारंवार केलेल्या पत्रव्यवहाराला कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, असे सांगितले जाते. गेल्या काही दिवसांत झालेल्या इंधन दरवाढीमुळेही वाहतुकीचे दर परवडत नाहीत, असे सांगण्यात आले. कंपन्यांबरोबर केलेले दर करार आणि औषधांची आवश्यकता याचा ताळमेळ बसत नसल्याने सर्वत्र अडचण असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी आवर्जून सांगतात. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातही गेल्या काही दिवसांपासून या औषधांचा तुटवडा आहे. चालू वर्षांसाठी ५ कोटी ३२ लाख रुपयांची तरतूद वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने केली होती. पैकी १ कोटी ३३ लाख १ हजार एवढीच रक्कम खरेदीसाठी देण्यात आली. तरतूद वितरित करताना अवलंबिल्या जाणाऱ्या ‘बजेट डिस्ट्रिब्युशन सिस्टम’वर (बीडीएस) वेळेवर रक्कम न आल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. एकूण औषधांसाठी दिलेल्या तरतुदींपैकी ६७ हजार ८०० रुपयेच शिल्लक आहेत. आणखी पाच महिने एवढय़ा रकमेत औषधांची काटकसर कशी करायची, असा प्रश्न विचारला जातो. याची उत्तरे वरिष्ठ अधिकारी मात्र देत नाहीत. जिल्हा रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही औषधांचा कमालीचा तुटवडा जाणवत आहे.
बॅक्सस्टर ही औरंगाबादस्थित कंपनी असून कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता उत्पादनाविषयीची माहिती मिळू शकली नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग मात्र सलाइनचा तुटवडा असल्याबाबत अनभिज्ञच आहे. आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या, की गेल्या आठवडय़ापर्यंत सलाइनचा तुटवडा जाणवत होता. बॅक्सस्टर कंपनीकडून अडचण होती. आता सर्वत्र सलाइन पोहोचले आहे. अन्य औषधांचा तुटवडाही जाणवत असला तरी प्रतिजैविके, कापूस, जखम बांधण्याची पट्टी आदी साहित्यही पुरविले जात आहे. काही ठिकाणी जिल्हास्तरावर खरेदीची मुभाही देण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत औषधपुरवठा सुरळीत होईल.