ई-कचऱ्यात महाराष्ट्र अव्वल! Print

कॅडमियम यकृतासाठी घातक
सचिन देशपांडे, अकोला

इलेक्ट्रॉनिक अर्थात ई-कचऱ्यात महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळवले असून देशात सर्वाधिक ई-कचरा हा राज्यातून तयार होत असल्याची माहिती एका अहवालात दिली आहे. यंदा देशात आठ लाख टन ई-कचरा तयार होण्याचा अंदाज आहे. राज्यात तीन ठिकाणी खासगी संस्थांद्वारे ई-कचरा संकलन केले जाते तर सात ठिकाणी पुनप्र्रक्रिया केली जाते. ई-कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची क्षमता वर्षांला केवळ दहा हजार टन एवढीच असल्याने अशा उद्योगांची संख्या वाढवावी लागणार आहे. ई-कचरा हा प्रामुख्याने एलसीडी, एलईडी, दूरचित्रवाणी संच व त्यापाठोपाठ संगणकातून तयार होतो. संगणकाचे कालबाह्य़ मॉनिटर, सीपीयूमधील घटक व प्रिंटर कालांतराने ई-कचरा ठरतात. मोबाइलच्या वाढत्या वापराने कालबाह्य़ झालेले मोबाइल, रेडिओ, मायक्रोव्हेव ओव्हन, फॅक्स मशीन, वातानुकूलित यंत्र, फ्रिज, वॉशिंग मशिन यामुळेही ई-कचरा वाढत चालला आहे. ई-कचऱ्यात मोठय़ा प्रमाणावर लीड, मक्र्युरी, कॅडमियम यांसारखे घातक पदार्थ असतात. या कचऱ्यावर योग्य पुनप्र्रक्रिया न केल्यास जमीन, हवा व पाण्याचे प्रदूषण होण्याची शक्यता असते. सरकारी आकडेवारीनुसार सन २००७ मध्ये राज्यात सुमारे २५ हजार टन ई-कचरा तयार झाला होता. त्या वेळेस देशात सुमारे सव्वातीन लाख टन ई-कचरा तयार झाला  होता. यंदा देशात सुमारे आठ लाख टन ई-कचरा तयार होण्याचा अंदाज असून त्यात राज्याचा वाटा सर्वाधिक असेल. राज्यात मुंबईत सर्वाधिक, त्यानंतर पुणे, नागपूर येथे ई-कचरा मोठय़ा प्रमाणावर तयार होतो. ई-कचऱ्यातील कॅडमियम हे मनुष्याच्या यकृतास घातक असते. एलसीडीमध्ये मोठय़ा प्रमाणात शिसे असते. शिसे हे लहान मुलांबरोबर मोठय़ांच्या स्नायूंवर परिणाम करतात.  देशातील ई-कचऱ्यांवर होणारे पुनर्प्रक्रिया उद्योग अत्यंत कमी आहे. एका अहवालानुसार देशातील केवळ ५ टक्के ई-कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याने ९५ टक्के ई-कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा एक मोठा प्रश्न आहे.  ई-कचऱ्याबाबत महाराष्ट्राने निश्चित स्वरूपाचे कडक धोरण तयार करण्याची गरज आहे.