विजय पांढरे यांचा अचानक स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज Print

 

प्रतिनिधी,नाशिक
जलसंपदा विभागाचे अंतरंग पुरते उलगडून राजकीय भूकंप घडविणारे येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीचे मुख्य अभियंता तथा तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य विजय पांढरे यांनी बुधवारी अचानक स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देत या वादग्रस्त विभागास अखेर कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.

वैयक्तिक कारणास्तव आपण स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत असून पुढील काळात बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा या मूळ गावी अध्यात्मिक कार्यासह ग्रामीण भागात सिंचनाविषयी जनजागृती करणार असल्याचे पांढरे यांनी ‘लोकसत्ता’कडे नमूद केले. आपल्या शिस्तप्रिय व कार्यकठोर स्वभावामुळे सुमारे ३२ वर्षांच्या सेवाकाळात तब्बल १६ हून अधिक वेळा पांढरे हे बदलीला सामोरे गेलेले आहेत.
राजकीय नेते, ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या साखळीमुळे सिंचनाच्या कामावर दशकभरात खर्ची पडलेल्या एकूण निधीपैकी तब्बल ३५ हजार कोटीचा निधी पाण्यात गेल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पांढरे हे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. सिंचन विभागाची श्वेतपत्रिका काढण्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत कुरघोडीचे नाटय़ रंगले असताना सिंचन प्रकल्पांच्या कामात कोणाकोणाचे अन् कसे उखळ पांढरे झाले, यावर त्यांनी गोपनीय पत्रांद्वारे प्रकाशझोत टाकल्याची परिणती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यात झाली. हा राजकीय भूकंप आणि त्या दरम्यान राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून झालेल्या अतिशय हीन पातळीच्या आरोपांचा धैर्याने सामना करणाऱ्या पांढरे यांनी हे वातावरण शांत झाल्यानंतर अचानक स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज शासनाकडे सादर केला. त्यांचा सेवाकाळ पूर्ण होण्यास अद्याप दहा महिन्यांचा अवधी शिल्लक होता. हा निर्णय आपण वैयक्तिक कारणास्तव घेतला असून त्यासाठी कोणाचाही दबाव आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.