रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती भोईर यांची पोलीस कोठडीत रवानगी Print

प्रतिनिधी, अलिबाग
अलिबागच्या सत्र न्यायालयात शरणागती पत्करल्यानंतर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांना आज अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ५ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. भोईर आणि त्यांचे सहा सहकारी यांनी काल अलिबागच्या जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरणागती पत्करली होती. न्यायालयाने यावेळी भोईर यांनी केलेला अंतरीम जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला होता. तसेच सर्व आरोपींना आज मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार भोईर तसेच त्यांच्या सहा सहकाऱ्यांना आज मुख्य न्यादंडाधिकारी पी.बी. घुगे यांच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्यांची ५ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
११ सप्टेंबरला चोंढी येथे असलेल्या व्हिण्टेक कॉम्प्युटर येथे घुसून जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर आणि इतर ३८ जणांनी हल्ला केला होता. या प्राणघातक हल्ल्यात विजय थळे आणि इतर सहा जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात दिलीप भोईर यांच्यासह ३८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र तेव्हापासून दिलीप भोईर आणि त्यांचे सहा सहकारी फरारी होते.
आजच्या सुनावणीदरम्यान सरकारच्या वतीने अ‍ॅड. वर्षां पाटील यांनी काम पाहिले, तर फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. प्रवीण ठाकूर आणि आरोपींच्या वतीने अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी काम पाहिले.