पेयजल योजनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र चौकशी समितीची मागणी Print

राष्ट्रवादी आणि काँग्रेसची घोषणा- मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार याचिका
प्रतिनिधी, अलिबाग
रायगड जिल्ह्य़ातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात आलेल्या पेयजल योजनामध्ये घोटाळे झाले असून जिल्हा परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पेयजल योजनेच्या चौकशीकरिता आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे दोन्ही पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार मधुकर ठाकूर, राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष विजय कवळे, प्रकाश धुमाळ, जनार्दन पाटील, अलिबाग शहर अध्यक्ष महेश मोहिते आणि राजा केणी उपस्थित होते.
गेल्या दोन ते तीन वर्षांत अलिबाग तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. यात वेश्वी, चेंढरे, कुसुंबळे, शहाबाज, हाशीवरे, कुरुळ यांसारख्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. योजनांमधील भ्रष्टाचाराबाबत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे आजवर अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र एकाही प्रकरणात प्रशासनाने कारवाई केलेली नाही. ग्रामपंचायतीतील सत्तेच्या जिवावर बेकायदेशीर ठराव घेणे, बोगस इतिवृत्त बनवणे, जुन्याच पाइपलाइनचा वापर करून नव्या योजनांची बिले काढणे यांसारखे प्रकार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे, तर ग्रामविकासमंत्र्यांनी आदेश देऊनही अधिकारी कारवाई करत नसल्याचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी सांगितले. पेयजल योजनामध्ये २५ टक्केदेखील काम केले जात नसल्याचे त्यांनी सांगितले, तर लाचलुचपत विभागाकडेही या प्रकरणाची तक्रार देणार असल्याचे जनार्दन पाटील यांनी स्पष्ट केले.
सरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा अधिकारी यांच्या संगनमताने पेयजल योजनांमधील घोटाळे सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी या वेळी प्रकाश धुमाळ यांनी केली.