बचत गटांसाठी महापालिका उभारणार हक्काची बाजारपेठ -यतीन वाघ Print

प्रतिनिधी, नाशिक
महिलांमधील उद्योगशीलता वाढविण्यात बचत गटांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असून या बचत गटांना शाश्वत विकासासाठी महापालिकेच्या जागेवर स्वतंत्र विक्री केंद्र उभारण्याचा प्रस्ताव लवकरच सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येईल, असे आश्वासन महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनी दिले. युवक मित्र मंडळ, लोकनिर्माण प्रकल्प आणि अश्वमेध सामाजिक संस्थेच्या वतीने मनसेच्या राजगड कार्यालयाजवळ आयोजित शुक्रवारी बचत गटांच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. वसंत गिते, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक राजन लोंढे, रामचंद्रन, बचत गट शाखेच्या अधिकारी वैशाली देशमुख, नामको बँकेचे अध्यक्ष प्रकाश दायमा, नगरसेविका सुवर्णा मटाले, यशवंत निकुळे, रमेश धोंगडे, हरिभाऊ लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते.
बचत गटांची संख्या वाढत असून ही महिला सबलीकरणाच्या दृष्टीने सकारात्मक बाब असली तरीही, या बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळत नाही. व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्या उत्पादनांचे योग्य विपणन होणे आवश्यक आहे. त्याकरिता हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला. पालिकेच्या जागेवर बचत गटांसाठी स्वतंत्र विक्री केंद्र उभारण्याचा प्रस्ताव लवकरच सभेत ठेवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी स्वतंत्र मॉल उभारण्याची गरज आ. गिते यांनी व्यक्त केली. बचत गटांसाठी आर्थिक सहकार्यासोबत प्रशिक्षण देण्यात येईल, असे बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक लोंढे यांनी सांगितले. प्रदर्शनात एकूण ४३ बचत गटांनी सहभाग घेतला असून सोमवापर्यंत ते खुले राहणार आहे. प्रदर्शनात कापडी पिशव्या, पर्सेस, ज्युटच्या पर्सेस, कलात्मक पणत्या, रांगोळी, सॉफ्टटॉइज, आर्टिफिशियल ज्वेलरी, पोह्यांचे पापड, वेफर्स, ग्रीटिंग कार्ड, कागदी फुले आदी असंख्य वस्तू आणि पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या वेळी प्रा. कैलास मोरे, ज्योती लांडगे, शोभा ठाकरे, विलास शिरसाट, सचिन नाईक, वंदना मोरे, गायत्री पाटील, सुनंदा कमानकर आदी उपस्थित होते.