केंद्रीय कृषी मंत्रालयाशी संबंधित भासवून संस्थेतर्फे युवकांची फसवणूक Print

चंदीगडमधील किसान सेवा केंद्राकडून नोकरीचे आमिष
प्रतिनिधी,  नाशिक
केंद्रीय कृषी मंत्रालयाशी संबंधित असल्याचे भासवून चंदीगड येथील किसान सेवा केंद्रातर्फे नोकरीचे आमिष दाखवून येथील अनेकांची फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी शहर पोलीस आयुक्तालयातील तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.
किसान सेवा केंद्राच्या वतीने पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर येथील केंद्राच्या शाखेसाठी  ‘ग्राहक सेवा प्रतिनिधी’ म्हणून २२ हजार ५०० रुपये या कायमस्वरुपी मासिक वेतनावर तब्बल ९२ पदे भरावयाची जाहिरात ३१ ऑगस्ट २०१२ रोजी एका स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर नाशिक येथील काही जणांनी नोकरीसाठी अर्ज केले. बाळासाहेब शांताराम तिदमे यांनी अर्ज केल्यानंतर तीन सप्टेंबर रोजी संबंधित व्यक्तीशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधल्यानंतर त्यांची पाच सप्टेंबर रोजी भ्रमनध्वनीवरुन मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर ०८२६५८११०५३ या क्रमांकावरुन तिदमे यांना मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाल्याचे सांगण्यात आले. घरच्या पत्त्यावर किसान सेवा केंद्रामार्फत तसे पत्रही आले. नोकरीचा करार करण्यासाठी दोन दिवसांच्या आत १५ हजार ५०० रुपये बँक खात्त्यात जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तिदमे यांनी २४ सप्टेंबर रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते क्रमांक २०१२९४८९३९३ मध्ये नरेंद्र तिवारी यांच्या नावे १५ हजार ५०० रुपये बँक खात्त्यात जमा केले. पैसे भरल्याच्या पावतीची प्रत This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it , या इमेलवर पाठविली. त्यानंतर २४ तासाच्या आत किसान सेवा केंद्राचे पथक लॅपटॉप आणि भ्रमणध्वनी घेऊन घरी येतील, असे सांगण्यात आले.
यानंतर आठवडा उलटला तरी तिदमे यांच्याकडे कोणीही न आल्याने त्यांनी ९१९५४०८८९२९६ या क्रमांकावर संपर्क साधला असता पुढील करार प्रक्रियेसाठी त्यांना पुन्हा १४ हजार ५०० रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यावर तिदमे यांनी पैसे भरण्यास नकार दिला व संबंधित सेवा केंद्राच्या संकेतस्थळाची माहिती घेतली असता कृषी मंत्रालयाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी तिदमे यांनी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे निवेदन देत या प्रकरणात अनेक जणांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.