सव्यसाची साहित्यिक अध्यक्ष झाल्याबद्दल आनंद - प्रकाश देशपांडे Print

खास प्रतिनिधी, रत्नागिरी  
मराठी साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये प्रवाही संचार असलेले सव्यसाची साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले आगामी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल मनस्वी आनंद झाल्याची प्रतिक्रिया चिपळूण लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. कोतापल्ले यांच्या एकतर्फी विजयाची बातमी येथे येऊन थडकताच साहित्य क्षेत्रामध्ये स्वागताची प्रतिक्रिया उमटली. येत्या जानेवारीत चिपळूण येथे होणाऱ्या या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर यजमान संस्था आहे. या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना देशपांडे म्हणाले की, डॉ. कोतापल्ले उत्तम कवी, कादंबरीकार, समीक्षक आहेत. साहित्याच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा प्रवाही संचार आहे. असा साहित्यिक संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आल्यामुळे खरोखर आनंद झाला आहे.  संमेलनाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेमध्ये अलीकडील काळात काही वेळा प्रादेशिकतावाद डोकावतो, पण आम्ही तसे मानत नाही. कवी केशवसुतांच्याच शब्दात म्हणायचे तर ‘जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत,’ अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे यजमान संस्था असूनही विशिष्ट साहित्यिकाचा पुरस्कार आम्ही केला नाही, असेही देशपांडे यांनी आवर्जून नमूद केले.