सिंधुदुर्गातील तरुणांनी सैन्यभरतीसाठी आग्रही राहावे - मेजर जनरल विजय पवार Print

वार्ताहर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात माजी सैनिक व त्यांच्या विधवांची संख्या जास्त आहे; त्यांची कदर शासनाने केली पाहिजे तसेच सैनिकी परंपरा असणाऱ्या या जिल्ह्य़ातील तरुणांनी आर्मीत भरती होण्यासाठी आग्रही राहावे. भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याची शिफारस करण्यात येईल असे पुणे येथील मेजर जनरल विजय पवार यांनी बोलताना सांगितले.
राज्य शासनाने माजी सैनिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी अभ्यास समिती म्हणजेच अध्ययन समिती नेमली आहे. त्या समितीचे मेजर जनरल विजय पवार, कोल्हापूरचे ब्रिगेडिअर व्ही. सी. घोरपडे येथे आले असताना पवार बोलत होते. या वेळी कर्नल सु. द. नाईक, कर्नल विजय सावंत उपस्थित होते.
सैनिक वसतिगृहात माजी सैनिकांच्या विविध पदाधिकारी व शिष्टमंडळाशी चर्चा करून वसतीगृह, कॅन्टीन सुविधा, मेडिकल सुविधांबाबत परिस्थिती जाणून घेतली. या वेळी विजय पवार म्हणाले, शैक्षणिक, मेडिकल व अन्य सुविधा माजी सैनिक, विधवा व त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.
विदर्भ, मराठवाडय़ाच्या तुलनेत सिंधुदुर्गातील माजी सैनिक व विधवांची संख्या जास्त आहे. माजी सैनिक तीन हजार व विधवा तीन हजारांपेक्षा जास्त असून विधवांची टक्केवारी राज्यात सिंधुदुर्गात अधिक आहे, असे मेजर जनरल विजय पवार म्हणाले. माजी सैनिक व विधवांच्या प्रति शासनाच्या भावना व सेवा देण्याच्या अंमलबजावणीची गरज आहे, असे पवार म्हणाले.
या जिल्ह्य़ात कीर्तीचक्रासह अनेकांनी देशसेवा करताना आहुती देऊन सिंधुदुर्गची मान उंचावली आहे. अनेक पुरस्कार सिंधुदुर्गच्या सुपुत्रांनी कमाविले आहेत. जिल्ह्य़ाच्या या परंपरेत तरुणांनी आर्मीत दाखल होण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुलांना शिक्षणही प्राधान्याने दिले पाहिजे, असे मेजर जनरल विजय पवार म्हणाले.
सातारा व कोल्हापूर येथे पीआरटीसी अंतर्गत सैन्यात भरतीसाठी प्रशिक्षण दिले जाते. सैन्य भरती सिंधुदुर्गात घेण्यात यावी व तत्पूर्वी प्रशिक्षण देण्याची सूचना शासनाला करण्यात येईल, असे मेजर जनरल विजय पवार म्हणाले.
कोकणात १२ टक्के तर उर्वरित महाराष्ट्रात ४० टक्के माजी सैनिक आहेत. त्या सर्वानाच शासनाच्या विविध सेवा मिळाव्यात, विधवांची संख्या सिंधुदुर्गात असल्याने त्यांच्यासाठी योजना आखावी म्हणून सूचना केली जाईल, असे मेजर जनरल विजय पवार म्हणाले.
फौजी आंबेखण गावात २३० माजी सैनिक व १५० विद्यमान देशसेवा करणाऱ्या सैनिकांची परंपरा आहे. या गावात घराघरात सैनिक परंपरा आहे. तशी परंपरा या भागानेही सुरू करावी, असे मेजर जनरल विजय पवार म्हणाले.
पर्यटन व मायनिंग या माध्यमातून विकास साधण्यासाठी माजी सैनिक महामंडळाला प्राधान्य दिले जावे अशी सूचना कर्नल सु. द. नाईक यांनी करून ही मागणी शासनाकडे करून माजी सैनिकांसाठी खास योजना आखली जावी, असे समितीला सुचविल्याचे कर्नल नाईक म्हणाले.