नागपूर-अमरावती इंटरसिटीवर रेल्वेचे ‘प्रेम’ Print

मनोज जोशी, नागपूर
एरवी पुरेसे प्रवासी नसल्याचे कारण सांगत अनेक महत्त्वाच्या मार्गावरील रेल्वेगाडय़ा बंद करणाऱ्या रेल्वे मंत्रालयाचा नागपूर-अमरावती इंटरसिटी या तोटय़ात चालणाऱ्या गाडीचा मात्र भलताच लळा लागला आहे. सुरुवातीपासून सरासरी दहा टक्के प्रवासीसंख्याही न गाठू शकलेली ही गाडी रेल्वेचे नुकसान करत असल्याचे लेखापरीक्षण व लेखा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळवूनदेखील रेल्वेने याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यातच माहिती अधिकाराखाली या रेल्वेबाबत माहिती देण्यातही टाळाटाळ केल्याचे उघड झाले आहे.  लेखापरीक्षण व लेखा विभागाच्या प्रधान लेखापरीक्षण संचालकांनी नागपूरच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना १५ मार्च २०१२ रोजी पाठवलेल्या पत्रात अमरावती-नागपूर एक्स्प्रेसला मिळणाऱ्या नगण्य प्रतिसादाकडे लक्ष वेधले होते. मार्च २०११ ते जानेवारी २०१२ या कालावधीत या गाडीतील ‘ऑक्युपन्सी’च्या आधारे त्यांनी आक्षेप घेतला. ही गाडी सुरू झाल्यापासून त्यातील प्रवाशांचे प्रमाण अत्यल्प असून, त्यामुळे ही गाडी चालवण्यासाठी रेल्वेला सतत नुकसान सोसावे लागत असल्याचा स्पष्ट उल्लेख करून त्यांनी रेल्वेला योग्य ती कार्यवाही करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ही गाडी चालवण्याचा खर्च, मिळणारा महसूल, गाडीच्या आर्थिक सक्षमतेची पाठराखण करणारे अधिकारी आणि गाडीमुळे होणाऱ्या नफ्या-तोटय़ाची रक्कम याबाबत नागपूरचे अविनाश प्रभुणे यांनी मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला माहितीच्या अधिकाराखाली माहिती विचारली होती. त्याला मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांनी टोलवाटोलवी करणारे उत्तर दिले. या गाडीचा ऑगस्ट २०१० मध्ये आढावा घेण्यात आल्याचे सांगताना त्यांनी प्रत्यक्षात २०१० सालच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांतील सहा दिवसांची आकडेवारी सादर केली. गंमत म्हणजे, यात नमूद केलेल्या २९ जानेवारी २०१० रोजी २७.५ टक्के प्रवासी क्षमता असल्याचा दावा रेल्वेने केला, त्या तारखेला म्हणजे शुक्रवारी ही गाडी धावलीच नव्हती! ही असमाधानकारक माहिती मिळाल्याने प्रभुणे यांनी अपीलीय अधिकाऱ्यांकडे अपील केले. त्यांचाही अनुभव काही वेगळा आलेला नाही. तुम्ही मागितलेली माहिती, गाडी चालवण्याच्या खर्चाची गाडीनिहाय आकडेवारी आणि त्याच्या नफ्या-तोटय़ाची माहिती हे कार्यालय ठेवत नाही, असे अतिरिक्तमहाव्यवस्थापक जी. एस. बॅनर्जी यांनी गेल्या २८ सप्टेंबरच्या पत्राद्वारे कळवले. दरम्यान, आपण विचारलेल्या मुद्यांची माहिती आमच्या विभागाशी संबंधित नसून या कार्यालयाकडे उपलब्ध नाही, असे नागपूरच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांनीही अर्जदाराला कळवले. प्रत्यक्षात प्रधान लेखापरीक्षण संचालकांनी पाठवलेले पत्र त्याआधीच त्यांना मिळाले असल्यामुळे संबंधितांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. राष्ट्रीय संपत्तीचे असे उघडउघड नुकसान होत असताना राजकीय पाश्र्वभूमीमुळे कुणी याबाबत बोलण्यास तयार नाही. गळ्यातील लोढणे बनलेली ही गाडी बंद करणे आवश्यक असूनही ते होत नाही आणि अकोलामार्गे भुसावळपर्यंत नवी इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू झाल्यास ती सक्षम ठरू शकेल हे माहीत असूनही रेल्वेने डोळ्यांवर कातडे ओढले आहे.