व्हच्र्युअल युनिव्हर्सिटीच्या ‘ई-कन्टेन्ट’साठी पुणे विद्यापीठाचा हातभार Print

प्रतिनिधी, पुणे
व्हच्र्युअल युनिव्हर्सिटीसाठी ‘ई-कन्टेन्ट’ तयार करण्याचे काम २०१४ -१५ पर्यंत पूर्ण होणार असून व्यवस्थापन, वाणिज्य विद्याशाखा आणि भारतीय शास्त्रीय संगीत या विषयांचा ई-कन्टेन्ट तयार करण्याचे काम पुणे विद्यापीठातील शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्रामध्ये (ईएमआरसी) सुरू आहे, अशी माहिती ईएमआरसीचे संचालक डॉ. समीरण वाळवेकर यांनी दिली. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून व्हच्र्युअल युनिव्हर्सिटी सुरू करण्याचा प्रकल्प २००९ मध्ये आखण्यात आला. नॅशनल मिशन इन एज्युकेशन थ्रू इन्फरेमेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (एन.एम.इ.आय.सी.टी) या योजने अंतर्गत हा प्रकल्प आखला आहे. त्यानुसार देशातील विविध २० केंद्रांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार ‘ई-कन्टेन्ट’ तयार करण्यासाठी विषय देण्यात आले आहेत. या प्रकल्पामध्ये साधारण ७० ते ७२ विषयांचा ‘ई-कन्टेन्ट’ तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक विषयाचे ३५० पाठ तयार करण्यात येणार आहे.  पुणे विद्यापीठातील ईएमआरसीकडे व्यवस्थापन, वाणिज्य विद्याशाखा आणि भारतीय शास्त्रीय संगीत या विषयांचा पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचा ई-कन्टेन्ट तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत डॉ. वाळवेकर यांनी सांगितले, ‘‘व्हच्र्युअल युनिव्हर्सिटी तयार करणारा अमेरिका व चीन नंतर भारत जगातील तिसरा देश आहे. आम्ही दीड वर्षे या प्रकल्पावर काम सुरू असून प्रत्येक विषयातील तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करून नंतर त्यांच्या व्याख्यानाचे रूपांतर ‘ई-कन्टेन्ट’मध्ये करतो. प्रत्येक ३० मिनिटांच्या व्याख्यानाची विभागणी ५ ते ७ मिनिटांच्या मोडय़ूलमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांला संपूर्ण व्याख्यानातील विशिष्ट मुद्दा अथवा भाग पाहू शकतो. विद्यार्थ्यांला स्क्रीनवर एकावेळी व्याख्यात्याचे प्रत्यक्ष व्याख्यान आणि व्याख्यानाचे स्क्रीप्टही दिसते. आम्ही आतापर्यंत भारतीय शास्त्रीय संगीताचे ८० पाठ पूर्ण केले आहेत. ई-कन्टेन्ट तयार करण्यासाठी ३डी ग्राफिक्स, मुलाखती अशा मार्गाचा अवलंब केला आहे.’’