पक्षाच्या ज्येष्ठ निष्ठावंतांना डावलले, मत पायदळी तुडवल्याची भावना! Print

महापौर-उपमहापौर निवडीनंतर नाराजीचा सूर
वार्ताहर, नांदेड

महापौरपदासाठी अब्दुल सत्तार यांना संधी देणाऱ्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी उपमहापौरपदासाठी पक्षाच्या ज्येष्ठ निष्ठावंतांना डावलून आनंद चव्हाण यांना संधी दिली. त्यामुळे नाराजीचा सूर उमटला आहे. याबाबत उघड प्रतिक्रिया कोणीही नोंदवली नसली, तरी महापौर-उपमहापौर निवडणुकीत नगरसेवकांचे मत पायदळी तुडवल्याची भावना नगरसेवकांमध्ये होती. नांदेड-वाघाळा महापालिकेत काँग्रेस पक्षाला काठावर बहुमत मिळाले. हैदराबादच्या ‘एमआयएम’ संघटनेने ११ नगरसेवक निवडून आणत काँग्रेस-राष्ट्रवादीची झोप उडवून टाकली. दोन्ही काँग्रेसने निवडणुकीदरम्यान एकमेकांवर प्रचंड तोंडसुख घेतले. पण निकालानंतर राष्ट्रवादीने सपशेल नांगी टाकत काँग्रेसला विनाशर्त पाठिंबा दिला.
काँग्रेसचे ४१ व १ अपक्ष अशा ४२ सदस्यांच्या जोरावर पक्षाने महापौर-उपमहापौरपदासाठी तयारी केली होती. बहुसंख्य नगरसेवकांच्या आग्रहाखातर महापौरपदी दिलीप कंदकुर्ते व उपमहापौरपदी फारूक अली खान यांची निवड करावी, अशा मन:स्थितीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते. बहुसंख्य नगरसेवकांचीही हीच मागणी होती. महापौर-उपमहापौर पदासाठी अशोक चव्हाण यांनी कोणत्याही नावाची घोषणा केली नव्हती. बुधवारी रात्रीपर्यंत कंदकुर्ते-फारूक अली यांची नावे निश्चित होती. ओम गार्डन येथे झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीतही याबाबत एकमत झाले होते. अशोक चव्हाण यांनी नावांची घोषणा केली नसली, तरी कंदकुर्ते-फारूक अली यांची नावे निश्चित होती, पण रात्री अचानक त्यात बदल झाला.
पालकमंत्री डी. पी. सावंत, खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी सत्तार यांच्या नावासाठी दबाव वाढवला. सत्तार यांना संधी दिली नाही तर आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मते मिळणार नाहीत, अशी भीतीही त्यांनी घातली. या तिघांच्या आग्रहाखातर अशोक चव्हाण यांना उमेदवार बदलावे लागले व गुरुवारी सकाळी सत्तार-आनंद चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. ‘एमआयएम’चा प्रभाव रोखण्यासाठी त्यांना संधी दिली, ही बाब नगरसेवकांनी स्वीकारली. पण आनंद चव्हाण यांना उपमहापौरपद बहाल करण्याची कृती बहुसंख्य नगरसेवकांना खटकली. दक्षिण मतदारसंघातून महापौरांना संधी दिल्यानंतर उपमहापौरपद उत्तर मतदारसंघाला देण्यात आल्याचा पवित्रा घेण्यात आला असला, तरी उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ व निष्ठावंत नगरसेवक आहेत. सुधाकर पांढरे, किशोर भवरे, स्वामी, अन्न्ोवार, कनकदंडे, उमेश पवळे, वीरेंद्रसिंग गाडीवाले, दिलीप कंदकुर्ते, फारूक अली खान यांच्यासारखे अनेक ज्येष्ठ नगरसेवक असताना त्यांना उपमहापौरपदी संधी देणे अपेक्षित होते, पण ज्येष्ठ, निष्ठावंतांना डावलून आनंद चव्हाण यांना संधी देण्याचा प्रकार निष्ठावंतांवर अन्याय करणारा आहे, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
काँग्रेसच्या संघटनावाढीमध्ये आनंद चव्हाण यांचे भरीव योगदान नाही, ते पक्षात नव्यानेच सक्रिय झाले आहेत. त्यांच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारीलाही निष्ठावंतांना डावलून त्यांना संधी देण्यात आली होती. आता त्यांना उपमहापौरपद देऊन काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी निष्ठावंत नगरसेवकांच्या जखमेवर मीठ चोळल्याची प्रतिक्रिया एका माजी नगरसेवकाने खासगीत नोंदवली.