सीमाभागात काळा दिन Print

प्रतिनिधी, कोल्हापूर

बेळगाव-निपाणीसह सर्व सीमाभागात गुरुवारी काळा दिन पाळण्यात आला. कर्नाटक शासनाच्या मराठीविरोधी धोरणाचा जोरदार निषेध नोंदविण्यात आला. बेळगाव निपाणी येथे काढण्यात आलेल्या मूकमोर्चात हजारो मराठी बांधव काळे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. १ नोव्हेंबर हा कर्नाटक शासन राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करते. तर हाच दिवस मराठी भाषक काळा दिन म्हणून पाळत आले आहेत. कर्नाटक शासनाच्या मराठी भाषकांवरील अन्याय, अत्याचार, भाषिक दबाव याच्या निषेधार्थ काळा दिवस पाळला जातो. बेळगाव येथे आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगाव शहर व तालुका समितीच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन केले होते. काळा दिवसाच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मराठी भाषक संभाजी चौक येथे मोठय़ा संख्येने जमले होते. काळे झेंडे घेतलेले आणि कर्नाटक शासनाच्या निषेधाचा फलक घेतलेल्या कार्यकर्त्यांमुळे मिरवणूक लक्षवेधी ठरली होती. बऱ्याच मराठी भाषक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आज बंद पाळला होता. मराठा मंदिर येथे मूक फेरीची सांगता झाली. यामध्ये तालुकाध्यक्ष व माजी आमदार बी. आय. पाटील, शहराध्यक्ष पी. के. पाटील, माजी महापौर विजय मोरे, शिवाजी सुंठकर, माजी महापौर मंदा बाळेकुंद्री, माजी उपमहापौर रेणू किल्लेदार, नगरसेवक यांचा सहभाग होता. सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आले होते
दरम्यान, निपाणी येथे महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेच्या वतीने निषेध फेरी व मूक मोर्चाचे आयोजन केले होते.
संभाजी चौकातून या फेरीला सुरुवात झाली. याचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे, जयराम मिरजकर, कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार सुजित मिणचेकर यांचा सहभाग होता. नेहरू चौकात झालेल्या सभेवेळी विजय देवणे यांनी कर्नाटक दिन साजरा करण्याचे आवाहन करणारे निपाणीचे आमदार काकासाहेब पाटील यांचा निषेध नोंदविला. मराठी माणसांच्या मतावर निवडून येऊन कन्नडीगांशी हातमिळवणी करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा, निपाणी नगरपालिकेवर भगवा फडकवा असे आवाहन त्यांनी केले.