माणिकरावांचा राष्ट्रवादीवर हल्ला! Print

वार्ताहर, परभणी

आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजप व नितीन गडकरी यांच्यावर भलताच खूश असतो. विदर्भातील सात जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत आहे. धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणाऱ्या राष्ट्रवादीने भाजपशी संबंध तोडून भाजपची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये अविश्वास ठराव आणण्यासाठी काँग्रेसला साथ द्यावी, तरच राष्ट्रवादीला धर्मनिरपेक्ष म्हणता येईल, असा जोरदार टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाक रे यांनी येथे लगावला. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची पाठराखण केल्याच्या पाश्र्वभूमीवर ठाकरे यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते.
नटराज रंगमंदिरात ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. २०१४ ची निवडणूक तयारी काँग्रेसने सुरू केली आहे, असे स्पष्ट करून ठाकरे यांनी, काँग्रेसविरोधात बोलून लोकांची दिशाभूल करणे हा भाजपचा एककलमी कार्यक्रम चालू आहे, अशी टीका करून मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही खात्यात, कुठल्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा गैरव्यवहार खपवून घेणार नाही, ही भूमिका स्वीकारली असल्याचे स्पष्ट केले. सिंचनावर दहा वर्षांत करोडो रुपये खर्च झाला, त्याचा जाब जनता विचारणार व सरकारला उत्तर द्यावेच लागेल. त्यामुळेच जलसिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मित्रपक्षानेही नाही म्हटले नाही, असे ठाकरे म्हणाले. लोकांच्या मनात शंका असेल, तर प्रशासन व सरकार यांच्याकडून स्पष्टीकरण मिळाले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे, असेही ठाकरे म्हणाले. गडकरी यांनी आपल्यावर केलेले आरोप निराधार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
परभणी जिल्ह्य़ात काँग्रेस कार्य मजबूत आहे. आम्ही लबाडाला घाबरत नाही, असा टोला जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावला. मित्रपक्षाशी दोन हात करण्याची मोकळीक द्या, अशी मागणीही त्यांनी केली. बोर्डीकरांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, असे सांगून जिल्हा पातळीवर पक्ष संघटनेत बदल करण्याची परवानगी देण्याची मागणी ठाकरे यांच्याकडे केली.
राष्ट्रवादीशी मतभेद नाहीत -ठाकरे
राजकारणात प्रत्येक पक्षाला आपले बळ वाढविण्याचा अधिकार असतो. काही विषयांवर उलटसुलट भाष्य करावे लागते. त्यामुळे आघाडीत बिघाड झाला हे म्हणणे योग्य नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीत कुठलेही मतभेद नाही, असे सांगून ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना २०१४ची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याबाबत स्पष्ट भाष्य करण्याचे टाळले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राला समाधानकारक स्थान मिळाले नाही ही बाब सत्य असली, तरी त्यामुळे अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. नेहमीच काँग्रेसने महाराष्ट्राला झुकते माप दिले आहे, असे ठाकरे म्हणाले.