जंगल मालकी हक्क मिळवण्यात गडचिरोली अव्वल Print

चार लाख हेक्टर जंगलावर मालकी
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर

नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या गडचिरोली जिल्हय़ातील गावकऱ्यांनी वनहक्क कायद्याचा वापर करत तब्बल ४ लाख हेक्टर जंगलावर मालकी हक्क मिळवला आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने जंगलावर मालकी मिळवणारा हा देशातला एकमेव जिल्हा ठरला आहे.  नक्षलवाद्यांचा हिंसाचार व तो मोठय़ा संख्येत तैनात केलेल्या सुरक्षा दलामुळे जिल्हय़ात कायम दहशतीचे वातावरण असते. अशा वातावरणात वावरणाऱ्या जिल्हय़ातील गावकऱ्यांनी वनहक्क कायद्याचा वापर करताना मात्र निर्भयता दाखवली आहे. या जिल्हय़ात १२ तालुके आहेत. यात १५२३ गावे आहेत. यापैकी ७८३ गावांनी गेल्या ४ वर्षांत वनहक्क कायद्याचा प्रभावीपणे वापर केला. या कायद्याचा आधार घेत या गावांनी वनहक्काचे वैयक्तिक दावे मंजूर करून घेतले. सोबतच गावाच्या सभोवती असलेल्या जंगलावरसुद्धा मालकी हक्क मागितला. प्रशासनाने गावकऱ्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत सामूहिक हक्काचे ८८९ दावे मंजूर केले. यामुळे गावकऱ्यांना ४ लाख ७ हजार ७५६ एकर जंगल वापरासाठी तसेच रक्षणासाठी मिळाले. २००६ मध्ये मंजूर झालेल्या वनहक्क कायद्याची अंमलबजावणी सध्या देशभरात कूर्मगतीने सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर गडचिरोली जिल्हय़ातील गावकऱ्यांनी मिळवलेले हे यश उल्लेखनीय आहे. देशात या कायद्यांतर्गत वैयक्तिक दावे मंजूर करवून घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र सामूहिक दाव्यांचे प्रमाण कमी आहे. संपूर्ण देशात जेवढे सामूहिक दावे मंजूर करण्यात आले त्यातील ८६ टक्के दावे एकटय़ा गडचिरोली जिल्हय़ातील आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत हे प्रमाण ९६ टक्के आहे. याच जिल्हय़ातील शंकरपूर व डोंगरमेंढा या दोन गावांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा आधार घेत सामूहिक मालकी मिळवलेल्या जंगलाच्या संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेतला. त्याची दखल घेत या दोन गावांना नुकताच युनिसेफने जैवविविधतेच्या प्रश्नावर सवरेत्कृष्ट काम करणारे गाव म्हणून शंकरपूरला पुरस्कार दिला.
 या दोन गावांच्या यशामुळे जंगल ताब्यात घेणाऱ्या या जिल्हय़ातील इतर गावांनासुद्धा आता गावाचा आर्थिक व शाश्वत विकास साधण्यासाठी पुढे काय करायचे हे कळले आहे, अशी प्रतिक्रिया या जिल्हय़ात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल, सुबोध कुळकर्णी, देवाजी तोफा व केशव गुरनुले यांनी आज लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली.