राष्ट्रवादीची साथ Print

नांदेडचे महापौर, उपमहापौरपद अपेक्षेप्रमाणे काँग्रेसकडे
वार्ताहर, नांदेड

नांदेड-वाघाळाच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे अब्दुल सत्तार, तर उपमहापौरपदी याच पक्षाचे आनंद चव्हाण यांची गुरुवारी निवड झाली. नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी नुकतीच निवडणूक झाली. निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. त्यामुळे महापौर-उपमहापौर काँग्रेसचाच होणार, हे निश्चित होते. निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला. काँग्रेसचे ४१, राष्ट्रवादीचे १० व एका अपक्षाच्या बळावर अब्दुल सत्तार व आनंद चव्हाण यांनी या पदांवर बाजी मारली.
महापौरपदासाठी अब्दुल हबीब बागवान (एमआयएम), बालाजी कल्याणकर (शिवसेना), गफ्फार खान गुलाम खान (राष्ट्रवादी), अब्दुल सत्तार व दिलीप कं दकुर्ते (दोन्ही काँग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या सर्वाचे अर्ज वैध ठरल्यानंतर तिघांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या सत्तार व शिवसेनेच्या कल्याणकर यांची सरळ लढत झाली. हात वर करून मतदान घेण्यात आले. महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांना ५२, तर शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांना १६ मते मिळाली. निवडणुकीत शिवसेना-भाजप युती कायम राहिली. ‘एमआयएम’ने आपला उमेदवारी अर्ज मागे घेत अप्रत्यक्षपणे काँग्रेसला सहकार्य केले. उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही याची पुनरावृत्ती झाली. फारूक हुसैन कासीम (एमआयएम), सुदर्शना खोमणे (शिवसेना), गफ्फार खान गुलाम खान (राष्ट्रवादी), आनंद चव्हाण, फारूकअली खान (दोन्ही काँग्रेस) या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सर्वाचे अर्ज वैध ठरल्यानंतर तिघांनी माघार घेतली. आनंद चव्हाण व सुदर्शना खोमणे यांच्यात सरळ लढत झाली. चव्हाण यांना ५२, खोमणे यांना १६ मते पडली. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी धीरजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होऊन  जिल्हाधिकाऱ्यांनी सत्तार व चव्हाण यांच्या निवडीची घोषणा केली.
जल्लोष..
सत्तार व चव्हाण यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी महापालिका सभागृहाबाहेर एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळू खोमणे यांनी याबाबत तीव्र निषेध करीत आक्रमक भूमिका घेतली, पण जिल्हाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम होते. अन्य महापालिकेत पत्रकारांना प्रवेश तर असतोच, शिवाय वृत्तवाहिन्यांसाठी विशेष सुविधा असते. नांदेडमध्ये मात्र पत्रकारांना प्रवेश नाकारणे चुकीचे आहे, असा आरोप करत बाळू खोमणे यांनी निषेध केला.
माजी मुख्यमंत्री महापालिकेत
महापौर-उपमहापौर पदांची निवड जाहीर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री डी. पी. सावंत, खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार महापालिकेत दाखल झाले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा अशोक चव्हाण यांनी सत्कार केला.