माजी राष्ट्रपतींच्या हट्टासाठी धावणारा ‘पांढरा हत्ती’ रेल्वेला डोईजड! Print

मनोज जोशी, नागपूर

सर्वच रेल्वेगाडय़ांमध्ये निश्चित आरक्षण मिळण्यासाठी प्रवाशांना टक्केटोणपे सहन करावे लागत असताना, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हट्टापायी सुरू झालेली एक रेल्वेगाडी गेली चार वर्षे अत्यल्प म्हणजे सरासरी १० टक्क्यांहूनही कमी प्रवासी संख्येसह धावत आहे. आर्थिकदृष्टय़ा अजिबात सक्षम नसताना धावणाऱ्या या रेल्वगाडीमुळे राष्ट्रीय संपत्तीचे अक्षरश: कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत असून ‘आंधळे दळते, कुत्रे पीठ खाते’ ही म्हण सार्थ ठरवणारे हे उदाहरण आहे. अमरावतीच्या स्नुषा असलेल्या प्रतिभा पाटील या राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी आपले काही हट्ट योग्य ठिकाणी पोहोचवणे सुरू केले.

अमरावतीसाठी काही नवीन गाडय़ा सुरू करण्याचा आणि येथील रेल्वे स्थानक हे ‘आदर्श रेल्वे स्थानक’ बनवण्यासाठी त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे आग्रह धरला होता. दस्तुरखुद्द राष्ट्रपतींचा हट्ट हा आदेश मानून या गाडय़ा सुरू करण्यात आल्या. यामध्ये आठवडय़ातून पाच दिवस उणेपुरे पावणेदोनशे किलोमीटर अंतर धावणारी नागपूर-अमरावती इंटरसिटी एक्स्प्रेसचाही समावेश आहे. मात्र, सुरुवातीपासूनच तोटय़ात असलेल्या या गाडीने रेल्वेचे भारी नुकसान केले आहे.
दर किलोमीटरला ६५० रुपये खर्च, एकूण अंतर ३६८ किलोमीटर आणि गाडी धावण्याचे एकूण दिवस ७५०, या हिशेबाने साडेतीन वर्षांत या गाडीला चालवण्याचा खर्च (ऑपरेटिंग कॉस्ट) १७ कोटी ९४ लाख रुपये होता. याउलट रेल्वेला या खर्चाच्या केवळ १.३१ टक्के, म्हणजे २३ लाख ६२ हजार ६६७ रुपये मिळाले. याचाच दुसरा अर्थ, रेल्वेचा निव्वळ तोटा १७ कोटी ७० लाख २१ हजार रुपयांचा होता!   
एप्रिल २००९ ते सप्टेंबर २०११ या कालावधीत दोन्ही बाजूंच्या प्रवासाचा विचार करता प्रवाशांची टक्केवारी फक्त५.०८ टक्के आणि मिळकतीचे प्रमाण ४.२५ टक्के होते, अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांनी माहिती अधिकाराखाली केलेल्या एका अर्जाच्या उत्तरात दिली आहे.      
एकूण प्रवासी क्षमता : ४ लाख ६१ हजार ;
 प्रत्यक्ष प्रवास करणारे : २३ हजार ४३०
 अपेक्षित उत्पन्न : ५.५५ कोटी रुपये.
प्रत्यक्ष मिळकत : २३.६२ लाख रुपये.  
हट्ट‘प्रतिभा’
प्रतिभा पाटील या राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी खास अमरावतीसाठी  नव्या गाडय़ा सुरू करण्याचा  रेल्वे मंत्रालयाकडे आग्रह धरला होता. यामध्ये आठवडय़ातून पाच दिवस उणेपुरे पावणेदोनशे किलोमीटर अंतर धावणारी नागपूर-अमरावती इंटरसिटी एक्स्प्रेसचाही समावेश आहे.